पावसाचा मारा कायम, धारावीत बांधकाम कोसळून ११ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:17 AM2017-07-21T02:17:16+5:302017-07-21T02:17:16+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोरदार मारा अधूनमधून सुरू असून, गुरुवारीही जोरदार पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर जोरदार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोरदार मारा अधूनमधून सुरू असून, गुरुवारीही जोरदार पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर जोरदार पावसाचा परिणाम झाला नसला तरी पडझडीमुळे मोठी हानी झाली आहे. धारावी येथील ९० फुटी रोडवरील ट्रान्झीट कॅम्प ब्लॉक क्रमांक ५ येथे तळमजला अधिक दोन माळे असे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले. सायन रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दोन, पूर्व उपनगरात एक, पश्चिम उपनगरात तीन अशा एकूण सहा ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. शहरात नऊ, पूर्व उपनगरात एक, पश्चिम उपनगरात चार अशा एकूण चौदा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात पाच, पूर्व उपनगरात तीन, पश्चिम उपनगरात सात अशा एकूण पंधरा ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता वांद्रे पश्चिम येथे रिझवी उद्यानालगतचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत साजीदा शेख ही महिला जखमी झाला. तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमीची प्रकृती स्थिर आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनने पश्चिम राजस्थान आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापत गुरुवारी देश व्यापला आहे. मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली आहे.