राज्यात मान्सूनपूर्व पावसाची आशाही धूसर; उन्हामुळे होरपळ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:45 AM2019-06-03T02:45:52+5:302019-06-03T02:46:04+5:30
उत्तर भारताचा विचार करता गेल्या २४ तासांत बिहार, आसाम, तामिळनाडू, बंगालची खाडी परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली असून, वेगाने वारेदेखील वाहत होते.
मुंबई : गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली असली, तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. कोकण प्रांतही तापला असून, येथे अनेक दिवसांपासून उष्णता जाणवत आहे. अद्याप केरळात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या नसल्याने राज्यातही जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरी दाखल होण्याची आशा धूसर झाली आहे.
स्कायमेटच्या दाव्यानुसार, पुढील काही दिवसांत हवामानात सकारात्मक बदल नोंदविण्यात येतील. त्यानुसार, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शिवाय राज्यातील काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता आहे.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, पुणे, नांदेड आणि औरंगाबाद येथे येत्या दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. परिणामी येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात येईल. मात्र विदर्भातील हवामान कोरडेच राहील. अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची उष्णतेच्या लाटेपासून सुटका होणार नाही.
उत्तर भारताचा विचार करता गेल्या २४ तासांत बिहार, आसाम, तामिळनाडू, बंगालची खाडी परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली असून, वेगाने वारेदेखील वाहत होते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, तेलंगणा, केरळमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. राजस्थानच्या दक्षिणपूर्व भागांत धुळीचे वादळ, मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पावसाची अधूनमधून हजेरी लागत असतानाच विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि दक्षिण जम्मू-काश्मीरमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव होता.
दिल्लीचे तापमान वाढले
उत्तर भारत उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, फरिदाबाद, पलवलसह लगतच्या परिसरात कोरडे आणि उष्ण वारे वाहतील. आकाश निरभ्र राहील. दिल्ली आणि लगतच्या परिसरातील गेल्या २४ तासांत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा ५ अंशांनी अधिक आहे.
४ जून रोजी हवेची दिशा बदलेल. ४ आणि ५ जून रोजी पंजाब, उत्तर हरियाणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ४ ते ६ जून दरम्यान दिल्लीसह लगतच्या परिसरात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. असे असले तरी दिल्लीसह लगतच्या परिसरातील कमाल तापमान ४२ आणि ४५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल.
येथे पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत सिक्किम, पश्चिम बंगालमध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये वेगाने वारे वाहतील. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पर्वतरांगांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील.
दिल्लीत मान्सून जुलैमध्ये?
२५ ते ३० जूनदरम्यान मान्सून दिल्लीत दाखल होतो. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून दिल्लीत जूनऐवजी जुलै महिन्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस दिल्लीकरांना दिलासा देईल, अशी आशा असली तरी दूरदूरवर मान्सूनपूर्व पावसाचीही चिन्हे नाहीत.