२४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल!

By admin | Published: May 30, 2017 03:43 AM2017-05-30T03:43:40+5:302017-05-30T03:43:40+5:30

मध्य पूर्व बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘मोरा’ चक्रीवादळात झाले आहे़ येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये

Monsoon rains in Kerala in 24 hours! | २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल!

२४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मध्य पूर्व बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘मोरा’ चक्रीवादळात झाले आहे़ येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़
नैऋत्य मोसमी पावसाने सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, मालदिव, कोमोरिन परिसर, तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम आणि पूर्वमध्य परिसरात प्रवेश केला़ मान्सूनची ही वाटचाल पाहता ३० मे रोजी तो केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे़ केरळबरोबरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, तमिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तरपूर्व भारताच्या काही भागात येत्या २४ तासांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती आहे़
मान्सून आला कसे ठरवितात?
मान्सूनने अंदमानच्या समुद्रात प्रवेश केल्यानंतरही भारतीय भूमीपर्यंत येण्यास बराच काळ लागतो़ अंदमानपासून केरळच्या दरम्यान जवळपास १२०० किमीचा समुद्राचा भाग आहे़ त्यामध्ये सॅटेलाईटशिवाय अन्य कोणतेही हवामान केंद्र नाही़ त्यामुळे केरळमध्ये मान्सून कधी येणार, याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते़ केरळमध्ये साधारण १० मेपासून कमीजास्त पाऊस पडण्यास सुरुवात होते़ केरळमधील मिनीकॉय, अमिनी तिरुअनंतपुरम, पुनालुर, कोल्लम, आलापुजा, कोट्टायम, त्रिसूर, कोजीकोड, तलासरी, तन्नूर, कुडुलू, मंगलोर या १४ हवामान केंद्रापैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २़५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे हा पहिला निकष आहे़ वारा पश्चिमेकडून दक्षिणकडे वाहत असला पाहिजे व ते ४ किमी उंचीपर्यंत पोहोचले पाहिजेत़ ५ ते १० रेखांक्ष व ७० ते ७५ रेखांक्ष दरम्यान उर्जा २०० वॅटपेक्षा कमी पाहिजे, हे निकष पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हवामान विभाग केरळमध्ये पाऊस आला, असे घोषित करते़ केरळमधील ६० टक्क्यांपेक्षा अधिक हवामान स्टेशनवर पाऊस झाला असून, सलग दुसऱ्या दिवशीही असाच पाऊस झाल्यानंतर हवामान विभागातर्फे केरळमध्ये मॉन्सून आल्याचे जाहीर केले जाईल़

अरुणाचल प्रदेश परिसरात जोरदार पाऊस

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वाशिम येथे ४३ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़

प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३५़८, जळगाव ४२़२, कोल्हापूर ३३़९, महाबळेश्वर २७, नाशिक ३५़४, सांगली ३५़५, सातारा ३४़३, सोलापूर ३९़२, मुंबई ३५़२, अलिबाग ३५़७, रत्नागिरी ३३़९़, पणजी ३५, डहाणु ३६़२, भिरा ३८, उस्मानाबाद ३८़२, औरंगाबाद ३८़४़, परभणी ४०़४, नांदेड ४०, अकोला ४१़५, अमरावती ३९़६, बुलढाणा ३९़६, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ४२़२, गोंदिया ३९़५, नागपूर ४१़६, वाशिम ४३, वर्धा ४१़५, यवतमाळ ४०़५़

Web Title: Monsoon rains in Kerala in 24 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.