राज्यात पावसाचे धुमशान

By Admin | Published: July 15, 2017 05:36 AM2017-07-15T05:36:22+5:302017-07-15T05:36:42+5:30

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला

Monsoon rains in the state | राज्यात पावसाचे धुमशान

राज्यात पावसाचे धुमशान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक/पुणे : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाचे अक्षरश: धुमशान सुरू असून, गोदावरीला पूर आला आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. लोणावळ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. दुबार पेरण्यांचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात १९३ मि.मी. एवढा झाला. त्या खालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. चालू मोसमात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला. शुक्रवारी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते.
>पश्चिम महाराष्ट्रात धरण क्षेत्रात जोर
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोयना, नवजा या परिसरात धो...धो पाऊस पडत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. कासारी, कोदे, पाटगाव या धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.
>गंगापूर धरण ६२ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर धरण पूर्णपणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
>मराठवाडा : वडवणी ४०, सोयेगाव ३०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, फुलंब्री, सेनगाव, सिल्लोड येथे प्रत्येकी २०, बीड, बिलोली, धर्माबाद, हिंगोली, नांदेड, पालम, परभणी, वैजापूर येथेही हलका पाऊस झाला.
विदर्भ : चिखलदरा, चिखली येथे प्रत्येकी ३०, भंडारा, गोंदिया, कारंजा, खामगाव, तुमसर येथे प्रत्येकी २०, बुलडाणा, हिंगणघाट, देऊळगाव राजा, जळगाव, मलकापूर, रिसोड आणि वाशिम येथेही चांगल्या सरी पडल्या.
>कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (४०) या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने, बिकानेर कोइमतुर गाडी कणकवली स्थानकात थांबविण्यात
आली होती.
>पुलाला
पडले भगदाड
नाशिक जिल्ह्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद केली आहे.
२२ जुलैनंतर जोर आणखी वाढणार
राज्यात २२ जुलैनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Monsoon rains in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.