राज्यात पावसाचा जोर ओसरला; नाशकात मात्र मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 03:06 AM2017-08-31T03:06:21+5:302017-08-31T03:06:41+5:30
राज्यभरात धुमशान कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरल्याने सर्वांनिच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम होता.
पुणे/मुंबई : राज्यभरात धुमशान कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरल्याने सर्वांनिच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम होता. सतत मुसळधार पडत असणाºया पावसाने गोदावरीसह इतर नद्यांना आलेला पूर कायम आहे. मध्य गुजरात व लगतच्या भागावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता सौराष्ट्र व गुजरातच्या उत्तरेकडील भागाकडे सरकले आहे़ त्यामुळे पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी रिमझीम पाऊस होता.
गगनबावड्यात २० बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला असून, तब्बल २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एक राज्यमार्ग तर तीन प्रमुख जिल्हामार्ग बंद झाला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात आठ घरांच्या पडझडीत सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
नाशकात पूरस्थिती कायम
नाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचपर्यंत १३४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार कायम राहिल्याने धरणातून विसर्ग सुरू राहिल्याने गोदावरी, दारणा नद्यांची पूरपरिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
गोसेखुर्दचे दरवाजे उघडले
विदर्भात गोसीखुर्द धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस कायम राहिला आहे. तो राहिल्याने धरणाचे सर्व म्हणजे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीला पूर आला आहे.
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
उत्तर कोकण व गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी ६४ ते ११५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता़ असून सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये तुरळक ठिकाणी ११५ ते २०४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
पुणे ४, कोल्हापूर ३, महाबळेश्वर १९, नाशिक ३, सांगली ०़३, सातारा १, अलिबाग २, रत्नागिरी २, पणजी २, डहाणु ४, भिरा ४, अकोला ०़३, अमरावती १ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.