मॉन्सून परतीच्या मार्गावर; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:38 AM2018-09-17T01:38:15+5:302018-09-17T06:55:19+5:30
१८ ते २० सप्टेंबरदरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : संपूर्ण देशात सध्या मान्सून क्षीण झाला असून तो परतीच्या मार्गावर आहे. १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानातून सुरू झाला आहे़ १८ व १९ सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ रविवारी सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरसह भूमध्ये पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मान्सून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक किनारपट्टी प्रदेश, केरळमधून क्षीण झाला आहे. ८ टक्के कमी पाऊस देशभरात आतापर्यंत सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश धरणे भरली आहेत़
कमी पावसाच्या पट्ट्यात बरसणार १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, सांगली या भागात तीन दिवस पावसाची शक्यता आहे़