१५ दिवसांहून अधिक काळ मान्सूननं फिरवली पाठ; राज्यात ५ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:25 AM2021-07-12T06:25:57+5:302021-07-12T06:29:02+5:30
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. नाशिकमधील मोठ्या धरणांत अवघा २७ टक्के पाणीसाठा.
मान्सूनने गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ ओढ दिल्याने राज्यातील ५ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अकोला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या ५ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाऊसमान घटले असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
राज्यात १९ जूनपासून पावसाने ओढ दिली आहे. एरवी कोकणात या महिन्यात जोरदार पाऊस पडत असतो. मात्र, त्या ठिकाणीही यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मध्य महाराष्ट्रातही आता पावसाने ओढ दिल्याने येथील अनेक जिल्ह्यांमधील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे.
नाशिकमध्ये पाणीकपात?
नाशिक जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरण प्रकल्पामध्ये अवघे २७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्यात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे.