पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची खेळी; शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हिप जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:45 PM2022-08-16T17:45:11+5:302022-08-16T17:47:10+5:30
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.
मुंबई - खरी शिवसेना कुणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असताना आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आणखी एक खेळी खेळली आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात आणले जाणार आहेत. अशावेळी मतदानाची संभावना असते. तेव्हा विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. एकीकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद नेमले आहे. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.
आमची अडचण नाही, आम्ही मूळ शिवसेना
आम्ही मूळ शिवसेना आहोत. विधानसभेत, लोकसभेत लोकप्रतिनिधींमध्ये आम्ही बहुमतात आहोत. जो सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आमची बाजू भक्कम आहे. सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे आमची कुठेही अडचण नाही असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या दोन गटात 'व्हिप-वॉर'
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक विचित्र आणि विचार करण्यापलिकडच्या गोष्टी घडत आहेत. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होतानाही सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या एकनाथ शिंदे बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला. या व्हिपमध्ये ठाकरे गटातील १६ आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनातही विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये 'व्हिप-वॉर' सुरू राहणार असून नक्की कोणाचा व्हिप लागणार हा पेच अधिकच वाढणार असल्याचं चित्र आहे.