५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 04:01 PM2022-08-25T16:01:17+5:302022-08-25T16:01:45+5:30
ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या असा इशारा भाई जगताप यांनी सरकारला दिला.
मुंबई - विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ५० खोके विधानावरून जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. नवीन सरकार आल्यानंतर सर्वात आधी आरेच्या कारशेडचा निर्णय घेतला. ९० टक्के काम झालंय असं सांगितले आणि त्याला १० हजार कोटी तरतूद केली. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असा आरोप भाई जगताप यांनी केला.
भाई जगताप म्हणाले की, सरकार कसं आले हे आम्ही बघतोय. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर एक सांगतो. ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या. ही वेळ महाराष्ट्रात येऊ नये. मात्र ज्यापद्धतीने सरकार म्हणजे आपण खूप ताकदवान आहोत. कुठली ताकद ५० खोके, सबकुछ ओके ही ताकद? या देशातील, राज्यातील जनतेने सगळं काही बघितले आहे असं त्यांनी म्हटलं.
बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल
भाई जगतापांच्या या विधानावर मंत्री दादा भुसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, भाई जगताप मुंबई, शेतकरी प्रश्नांवर सभागृहात बोलतायेत. त्यात ५० खोके विषय काढता. आपण सामान्य कार्यकर्त्यांमधून इथं पोहचलो आहोत. ही गोष्ट बरोबर नाही. आम्ही खूप काही बोलू शकतो. लोकशाही परंपरेत पातळी सोडायची म्हटलं तर बरेच काही बोलू शकतो. पातळी पाळली पाहिजे. बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल असं भुसे यांनी सांगितले. तसेच आपण मंथन करायला पाहिजे. विधान परिषदेत त्यांचे सहकारी येऊ शकले नाहीत त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. ते खोके कुठे गेलेत? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
...तेव्हा १०० खोके घेतले का?
भाई जगताप आणि दादा भुसे यांच्यात झालेल्या वादामुळे विधान परिषदेत गोंधळ झाला. त्यात सभापतींनी भाषण तपासून त्यातील वाक्य काढून टाकू असं म्हटलं. परंतु सभागृहातील गोंधळ संपला नाही. या वादात भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही उडी घेतली. दरेकर म्हणाले की, याठिकाणी आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. मंत्री राज्याचे प्रतिनिधित्व करतात. ५० खोके कुणी, कुणाला दिले हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करताना तुमचे १०-११ लोक कुठे गेले? त्यांनी १०० कोटी घेतले का? दुसऱ्यांवर बोट दाखवतात. दलित समाजाचं प्रतिनिधी करणाऱ्याला खोक्याच्या नादात काढून टाकले असा टोला दरेकरांनी लगावला. दरम्यान, काँग्रेस पक्षाचं आणि सदस्याचं काय झालं हे आमचं आम्ही बघू. परंतु आयुष्यभर जातीभेद, धर्मभेद करायचा हा यांचा अजेंडा आहे. दरेकर रेकॉर्डवर बोलले आहेत असं भाई जगतापांनी प्रतिटोला लगावला.