चक्रीय स्थितीने मान्सून रोखला!
By Admin | Published: May 27, 2016 12:23 AM2016-05-27T00:23:06+5:302016-05-27T00:23:06+5:30
पॅसिफिक महासागरामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ओढून घेत आहे. त्यामुळे मॉन्सून खोळंबला आहे. अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील
पुणे : पॅसिफिक महासागरामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ओढून घेत आहे. त्यामुळे मॉन्सून खोळंबला आहे. अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील त्याची वाट सध्यातरी रोखली गेली आहे. पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी सांगितले की, ही चक्रीय स्थिती भारताच्या नैऋत्याकडून येणारे मोसमी पावसाचे वारे खेचून घेत आहे. त्यामुळे पाण्यांनी भरलेले ढग पॅसिफिक महासागराकडे वाहत आहेत. त्यामुळे अंदमान-निकोबार बेटांवरही मॉन्सून बरसण्याचे प्रमाण कमी झाले
आहे. पॅसिफिक महासागरामध्ये आत्ताच हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ती पुढील ७ दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ७ दिवस मॉन्सूनची आगेकूच होणार नाही. (प्रतिनिधी)
हवेची चक्रीय स्थिती
- यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर नियोजित तारखेच्या दोन दिवस अगोदर म्हणजे
१८ मेला दाखल झाला.
- ७ जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज यापूर्वी वर्तविला होता.
- चक्रीय स्थिती असली तरी हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज अजूनही कायम ठेवला आहे.