Monsoon Update: मान्सुनच्या लपंडावाने चिंता वाढवली! राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:40 AM2022-06-20T06:40:21+5:302022-06-20T06:42:36+5:30
Monsoon Update: नेहमीपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये आगमन झालेल्या मान्सूनने कर्नाटकपर्यंत चांगली मजल मारली. मात्र १ जूनपासून राज्यात काही ठिकाणचा अपवादवगळता संपूर्ण राज्यात सलग असा पाऊसच झाला नाही.
पुणे : नेहमीपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये आगमन झालेल्या मान्सूनने कर्नाटकपर्यंत चांगली मजल मारली. मात्र १ जूनपासून राज्यात काही ठिकाणचा अपवादवगळता संपूर्ण राज्यात सलग असा पाऊसच झाला नाही. त्यामुळे १ ते १९ जूनपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे.
पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्गवगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाऊस कमी झाला आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातच पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे. मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने तेथे यंदा काहीशी चांगली परिस्थिती आहे.
नुसतीच गुरगुर, शिडकावा आणि ऊन
मुंबई : रविवारी मान्सूनने जवळजवळ संपूर्ण राज्य व्यापले असले, तरीही महाराष्ट्राला पुरेशा पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. २० ते २३ जून या काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात फक्त बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.