महाराष्ट्रात मान्सूनचे ७ जून रोजी आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:23 AM2020-04-20T04:23:02+5:302020-04-20T04:24:14+5:30
एक दिवस उशिरा आगमन; नागपूरमध्ये २ दिवस उशीर होणार
पुणे : गेल्या दशकातील मान्सूनच्या आगमानाच्या अभ्यासावरुन मान्सूनच्या आगमन व परतीच्या तारखा भारतीय हवामान विभागाने निश्चित केल्या होत्या़ मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे शेतकरी तसेच व्यावसायिकांचे नियोजनामध्ये गोंधळ होऊ लागला़ त्यामुळे हवामान विभागाने १९६१ ते २०१९ मधील मान्सूनच्या आगमन व परतीचा अभ्यास करुन नवीन तारखा जाहीर केल्या आहेत़ या नव्या तारखांनुसार मॉन्सूनचा अंदाज वर्तविला जाणार आहे.
केरळमध्ये १ जूनला मान्सूनच्या आगमनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे़ नव्या तारखांनुसार काही ठिकाणी एक दिवस ते काही ठिकाणी ३ ते ४ दिवसांने मान्सूनचे आगमन लांबणार आहे़ महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन गोवा व दक्षिण कोकणात ७ जून रोजी होणार आहे़ मात्र, कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत मान्सूनचे आगमन एक दिवस उशीरा होणार आहे़ नागपूरमध्ये २ दिवस तर जळगावमध्ये ५ दिवस उशीराने आगमन होणार आहे़ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात जुन्या तारखांनुसार आता ३ ते ७ दिवस उशीरा मान्सूनचे आगमन होणार आहे.
त्याचवेळी मान्सूनच्या परतीचा प्रवास ७ ते १५ दिवस उशीरा सुरू होणार आहे़ मात्र, दक्षिण भारतातून मान्सून १५ ऑक्टोबरलाच परतेल.
आगमनाचे नवे निकष
यापूर्वी मान्सूनच्या आगमनाच्या तारखा १९०१ ते १९४० दरम्यानच्या मान्सूनच्या आगमनानुसार निश्चित करण्यात आल्या होत्या़ आता नव्या तारखा १९६१ ते २०१९ दरम्यानच्या अभ्यासावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत़ तसेच मान्सूनच्या परतीच्या तारखा पूर्वी १९०१ ते १९४० दरम्यानच्या अभ्यासावरुन निश्चित केल्या होत्या़ आता १९७१ ते २०१९ दरम्यानच्या मान्सूनच्या परतीच्या अभ्यासावरुन नव्या तारखा निश्चित केल्या आहेत़
मान्सूनच्या नव्या तारखा
ठिकाण मान्सून आगमन परतीचा प्रवास
नव्या तारखा जुन्या तारखा नव्या तारखा जुन्या तारखा
दक्षिण कोकण ७ जून ७ जून १४ ऑक्टोबर १० ऑक्टोबर
कोल्हापूर ९ जून ९ जून ११ ऑक्टोबर १ ऑक्टोबर
(महाराष्ट्र)
सातारा १० जून ९ जून ९ ऑक्टोबर ३० सप्टेंबर
पुणे १० जून ९ जून ११ ऑक्टोबर ६ ऑक्टोबर
मुंबई ११ जून १० जून ८ ऑक्टोबर २९ सप्टेंबर
अहमदनगर १२ जून १० जून ८ ऑक्टोबर २९ सप्टेंबर
सुरत (गुजरात) १९ जून १३ जून २ ऑक्टोबर २५ सप्टेंबर
जळगाव १८ जून १३ जून ६ ऑक्टोबर २७ सप्टेंबर
नागपूर १५ जून १३ जून ६ ऑक्टोबर ६ ऑक्टोबर