मान्सून पुन्हा सक्रिय होणार
By admin | Published: July 10, 2017 04:38 AM2017-07-10T04:38:54+5:302017-07-10T04:38:54+5:30
काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून तीन ते चार दिवसांत पुन्हा एकदा सक्रिय होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून तीन ते चार दिवसांत पुन्हा एकदा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. १३ जुलैपासून सर्वत्र पुन्हा पावसास सुरुवात होईल, असे हवामान विभागाने सांगितले.
जून महिन्याच्या उत्तरार्धात सक्रिय झालेल्या मान्सूनने, जुलै महिन्याच्या पूर्वार्धात मात्र पूर्णत: विश्रांती घेतली. कुठेतरी तुरळक सरी वगळता, अन्यत्र पाऊस झालेला नाही. १० जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ११ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १२ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. १३ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्याने उकाडा वाढला होता. मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याने वातावरणात गारवा निर्माण होईल.