मान्सून ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:45 AM2019-09-28T03:45:41+5:302019-09-28T07:00:13+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाचा अंदाज; सलगता कायम राहिल्यास जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता
- सचिन लुंगसे
मुंबई : देशासह राज्यात धो धो कोसळणारा पाऊस रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत असतानाच २६ सप्टेंबरपर्यंत देशभरात मान्सूनने १०७ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टक्केवारी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक असून, परतीचा पाऊस सुरू होण्यास अद्यापही बहुतांश कालावधी शिल्लक आहे. परिणामी, १०७ टक्क्यांवर पोहोचलेला मान्सून सप्टेंबर महिना संपेपर्यंत ११० टक्क्यांपर्यंत विक्रमी मजल मारेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाची नोंद जास्तीचा मान्सून म्हणून केली जाईल.
१ जून ते २७ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९३१.५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात मात्र या काळात सरासरी ८६९.४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. देशात सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला असून, ही नोंद ७ टक्के अधिक आहे.
राज्यांचा विचार करता राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गोवा, कर्नाटक, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांत सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांत आतापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंद
महाराष्ट्राचा विचार करता सोलापूर, बीड, लातूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सर्वांत कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत अतिरिक्तपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.
उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आतापर्यंत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.