मान्सून 30 मे ला पोहोचणार केरळात

By Admin | Published: May 16, 2017 12:01 PM2017-05-16T12:01:43+5:302017-05-16T12:28:14+5:30

अंदमानात पोहोचलेला मान्सून येत्या 30 मे रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

The monsoon will reach Kerala on May 30 | मान्सून 30 मे ला पोहोचणार केरळात

मान्सून 30 मे ला पोहोचणार केरळात

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 16 - अंदमानात पोहोचलेला मान्सून येत्या 30 मे  रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून 1 जूनला केरळात पोहोचल्यानंतर पुढच्या सात दिवसात महाराष्ट्रात पोहोचतो.  यंदा हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार व्दीपसमूहामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण त्याच्या एकदिवस आधीच 14 मे रोजी रविवारी मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. सध्या मान्सून अंदमानमध्ये स्थिर झाला असून, तिथे अनेक भागात पाऊस सुरु आहे. 
 
मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला असेच पोषक वातावरण राहिले तर, मान्सून नियोजित वेळेत राज्यात दाखल होईल. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले सर्वचजण सध्या मान्सूनच्या पावासाची चातकासारखी वाट पाहत आहेत. देशाची अर्थव्यवस्था ब-याचप्रमाणात मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी, सरकार, उद्योजक या सर्वांचीच समाधानकारक पाऊस व्हावा अशी इच्छा आहे. 
यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
हवामान विभागाच्या सुधारीत अंदाजानंतर शेअर बाजारानेही उसळी घेतली होती. गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
असा होतो पावसाचा प्रवास
सर्वसाधारणपणे दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर, २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सून येतो. त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो.
 

Web Title: The monsoon will reach Kerala on May 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.