‘एकरकमी’साठी महिन्याची मुदत

By Admin | Published: November 7, 2015 12:40 AM2015-11-07T00:40:36+5:302015-11-07T00:42:04+5:30

ऊस परिषद : राजू शेट्टींचा इशारा; यंदा कारखाने बंद ठेवून आंदोलन नाही, कायद्याने न दिल्यास दंडुका हातात घेऊ

Month's term for 'one-dimensional' | ‘एकरकमी’साठी महिन्याची मुदत

‘एकरकमी’साठी महिन्याची मुदत

googlenewsNext

राजाराम लोंढे, भीमगोंड देसाई
ल्ल कोल्हापूर
एकरकमी एफआरपी ही काळ््या दगडावरची रेघ आहे, रक्त सांडले तरी बेहत्तर; परंतु त्याबाबत आम्ही कसलीही तडजोड करणार नाही; परंतु यंदा दुष्काळामुळे नदीत पाणी नाही, शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे त्याचे नुकसान होऊ नये यासाठी यंदा आम्ही ‘कारखाने बंद आंदोलन’ करणार नाही. कारखान्यांना ५ डिसेंबरपर्यंतची मुदत देऊ. तोपर्यंत त्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास मात्र दंडुका हातात घेत चालू साखर कारखाने बंद पाडू, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी जयसिंगपूरला झालेल्या विराट ऊस परिषदेत दिला.
अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत होते. जयसिंगपूरच्या ऐतिहासिक विक्रमसिंह मैदानावर ही चौदावी ऊस परिषद झाली. शहीद शेतकरी चंद्रकांत नलवडे व कुंडलिक कोकाटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिषदेला सुरुवात झाली. परिषदेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड, पुणे, सोलापूर, अहमदनगरसह शेजारच्या कर्नाटकातूनही प्रचंड संख्येने शेतकरी आले होते. ऊस आंदोलनात अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेट्टी यांच्याच नेतृत्वावर विश्वास असल्याचे या परिषदेने दाखवून दिले. संघटनेच्या इतिहासात प्रथमच त्यांनी ‘कारखाने बंद न करण्याचा’ महत्त्वाचा निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा बदलली. गेली अनेक वर्षे कारखानदार व सामान्य माणूसही संघटनेने कारखाने बंद करून पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत होते. त्याची दखल घेत संघटनेने हे पाऊल टाकले.
खासदार शेट्टी म्हणाले,‘संघटना जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करण्याची कुणाची हिंमत नाही; परंतु संघटनेने कारखाने बंद केले तर कारखानदार ऊस तोड मजुरांना आणणार नाहीत व त्यातून काही नुकसान झाले तर त्याचे खापर संघटनेच्या माथ्यावर फोडतील. यंदा पाऊस कमी झाला आहे. नदीत पाणी नाही. कधी एकदा ऊसतोड होते यासाठी शेतकरी आगतिक आहे. त्यामुळे त्याची पुन्हा अडचण करण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही यंदा कारखाने सुरू करण्यास परवानगी देत आहोत; परंतु कारखानदारांना ५ डिसेंबरपर्यंत महिन्याची मुदत देत आहोत. तोपर्यंत त्यांनी एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे. या महिन्याभरात आम्ही सरकार व कारखानदारांनी बोलाविले तर ५० वेळा त्यांच्याकडे चर्चेसाठी जाऊ परंतु एकरकमी एफआरपीबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.’
ऊस परिषद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता,असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले,‘सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही आपल्याला पत्र दिले आहे. त्यांनीही सरकार एकरकमी एफआरपीबाबतच ठाम असल्याचे स्पष्ट के ले आहे. सहकारमंत्री, संघटना व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दोन दिवसांत एकत्रित बैठक घेऊन चर्चा करावी. त्यातून तोडगा न निघाल्यास मी स्वत: पुढाकार घेऊन बैठक घ्यायला तयार आहे; परंतु संघटनेने यंदा आक्रमक आंदोलनाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे यंदा आम्ही आंदोलनाचे पाऊल उचलत नाही; परंतु सरकारने आपला दिलेला ‘शब्द’ पाळावा. त्यांनी धरसोडवृत्ती बाळगू नये. आम्ही जे कायद्याने आहे, तेच शेतकऱ्यांना मिळावे, असे मागत आहोत. ते तुम्ही देणार नसाल तर मग मात्र आम्हाला दंडुका हातात घ्यावा लागेल. त्यावेळी मग आम्ही मुख्यमंत्र्यांना अंकली पुलाजवळ नुसते निवेदन देऊन गप्प बसणार नाही; तर सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही.’ एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली थकबाकी वसुलीच्या नोटिसा लावून साखर विकावी, एफआरपीप्रमाणे पैसे देऊन उर्वरित रक्कम कारखान्याला द्यावी. वायदे बाजाराच्या माध्यमातून ५५०० कोटींचा घोटाळा झाला असून त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने वायदे बाजारावर वेळीच लक्ष दिले असते तर सहा हजार कोटींचे पॅकेज देण्याची गरज भासली नसती.
प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले,‘ही संघटनेची चौदावी परिषद आहे व ५६० पासून २६०० रुपयांपर्यंत ऊसदर मिळाला, हे या परिषदेचेच यश आहे. यासाठी आम्ही काठ्या झेलल्या आहेत, रक्त सांडले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हौतात्म आले आहे. आता विरोधी पक्षवाले आम्हाला विचारतात की, संघटना हातात बुडका घेऊन का बाहेर पडत नाही; परंतु आम्ही आता रस्त्यांवर उतरणार नाही. सरकारवर आमचा दबाव आहे व कारखानदार एफआरपी कशी देत नाहीत, हे देखील आम्ही पाहू. राज्य सरकारने जशा तुरडाळीच्या साठ्यांवर छापे टाकले तसे साखरेच्या साठ्यावर टाकले असते तर निम्मे साखरसम्राटच आज येरवड्याची हवा खायला गेले असते.’
परिषदेत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, उद्योगपती जया शेट्टी, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, सतीश काकडे, शिवाजीराव कुंदळे, विक्रम पाटील, शिवाजी माने, जयकुमार कोल्हे, पृथ्वीराज जाचक यांची भाषणे झाली. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. आण्णासाहेब चौगले यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार नानासाहेब माने, राहुल महाडिक, भगवान काटे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सीमा पाटील, विलास रकटे, शिरोळच्या सभापती शीला पाटील, प्रा. प्रकाश ढोकळे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एफआरपी थकविण्यात ‘वारणेचा वाघ’ पुढे
गतहंगामातील थकीत ‘एफआरपी’ची यादी वाचत एफआरपी थकविण्यात ‘वारणेचा वाघ’ विनय कोरे पुढे असल्याचे सांगत, शेट्टी म्हणाले, विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, विशाल पाटील, अशोकराव चव्हाण, बबनराव पाचपुते, विनोद तावडे यांच्याकडे कोट्यवधी रुपये थकले आहेत.
हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे खासगी कारखान्याने २३६७ रुपये एफआरपी बसत असताना २५२० रुपये दिल्याबद्दल खासदार शेट्टी यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले. जे चांगले आहे, त्यास आम्ही चांगलेच म्हणणार; परंतु त्याचवेळेला कोल्हापूर जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराकडे आम्ही डोळेझाक करणार नाही. मुश्रीफ यांनी या कारखान्याचीही जिल्हा बँक करू नये, अशी अपेक्षा शेट्टींनी व्यक्त केली.
‘बारामती’चा भस्मासुर
४मुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी बारामतीत होते. त्यांनी बारामतीला जरूर जावे; परंतु शरद पवार यांचे किती ऐकायचे, ते त्यांनीही एकदा ठरवावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
४सदाभाऊ खोत म्हणाले, ‘पंतप्रधानांना बारामती काय भारी आहे असे वाटते; परंतु ज्यांनी राज्याचे वाटोळे केले, सिंचन घोटाळे केले, साखर कारखानदारी मोडीत काढली ते देखील बारामतीच्याच भस्मासुरांचे पाप आहे हे विसरू नये.’
मुख्यमंत्री व दादांनाही कळत नाही
सहकारमंत्री चंद्रकांतदादा चांगला माणूस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांना यातील काय कळत नाही. मध्यंतरी त्यांनी जरा चुकीचे वक्तव्य केले. त्यांना अंकली पुलावर अडवल्यावर आपण असे म्हणालो नसल्याचे सांगितले. ‘त्यांना काय कारखान्यांवर कारवाई केली काय आणि नाही काय. किसका तुटे, किसका फाटे,’ अशी अवस्था असल्याची टीका खोत यांनी केली.

टीका होईल परंतु...
यंदा आम्ही कारखाने बंद न करण्याचे ठरविले असल्याने काहीजण आमच्यावर नक्कीच टीका करणार, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले,‘संघटनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आम्ही शेतकऱ्यांचा आम्ही फायदा नाही करून देऊ शकलो तरी चालेल परंतु त्यांचे नुकसान होता कामा नये, हे तत्त्व जोपासले आहे. त्यासाठी काहीवेळा दोन पावले मागे आलो आहे. यंदाचा निर्णयही त्याच भूमिकेतून
घेतला आहे.’

लाल दिव्यापेक्षा..
सदाभाऊ म्हणाले,‘काही लोक म्हणतात सदाभाऊंना आता लाल दिव्याची ओढ लागल्याने संघटना आक्रमक आंदोलन करायला तयार नाही; परंतु आमची जात लढवय्याची आहे आणि लाल दिव्यापेक्षा आम्हाला छातीवरील संघटनेचा लाल बिल्लाच जास्त प्यारा आहे.’

मंडलिकांचा निर्णय योग्यच..
गतहंगामात ऊसदराची कोंडी झाली असताना दिवंगत नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी २६७५ रुपयांची एफआरपी जाहीर केली व या आंदोलनाची कोंडी फोडली. त्यानंतर काहींनी मंडलिक यांची चेष्टा केली परंतु त्यांनी निर्णय घेतल्यानेच तिढा सुटण्यास मदत झाली, अशी आठवण शेट्टी यांनी करून दिली.

अजितदादांचा ‘चकरा-नखरा’
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती असताना विरोधी पक्ष म्हणून अजितदादा संवेदनशील नाहीत. शेतकऱ्यांंना मदत करण्याऐवजी त्यांचा ‘शांताबाईचा चकरा-नखरा’ सुरू असल्याची खिल्ली रविकांत तुपकर यांनी उडविली.

Web Title: Month's term for 'one-dimensional'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.