लेखकांची स्मारकं पुस्तकात दडलेली

By admin | Published: January 11, 2017 03:30 AM2017-01-11T03:30:50+5:302017-01-11T03:30:50+5:30

थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचे साहित्य कळायला काहीसे कठीण आहे,

The monuments of the authors are hidden in the book | लेखकांची स्मारकं पुस्तकात दडलेली

लेखकांची स्मारकं पुस्तकात दडलेली

Next

पुणे : थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचे साहित्य कळायला काहीसे कठीण आहे, कोणतेही पात्र मग ते ‘राजसंन्यास’मधले का असेना, स्वल्पविराम, पूर्णविराम, दोन जागांमधील पॉज या गोष्टी वाचकाला उमगल्या तर त्यांना जे म्हणायचं आहे ते वाचकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचते. त्यामुळे ‘राजसंन्यास’मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांची बदनामी झाली असे जे वाटते ते अल्पमतीप्रमाणे नसावे, अशी टीका करीत, अशा घटनांमुळे रसिकांच्या मनातील गडकरी यांच्या स्थानाला कुठेच धक्का लागणार नाही. कारण लेखक, कवी यांची स्मारकं त्यांच्या पुस्तकांतच दडलेली असतात, अशा शब्दांत गडकरींच्या पुतळा हटविण्याच्या घटनेचा नवनिर्वाचित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी निषेध व्यक्त केला.
संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी यांच्या वतीने ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयंत सावरकर आणि ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. याप्रसंगी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सचिन इटकर, भारत देसडला, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि निकिता मोघे उपस्थित होते.
कवी उद्धव कानडे यांनी दोन्ही संमेलनाध्यक्षांशी संवाद साधला, यामध्ये काहीशा वादग्रस्त मुद्द्यांचा चेंडूही ते त्यांच्या कोर्टात भिरकावत होते. मात्र, दोन्ही संमेलनाध्यक्ष संतुलन ढळू न देता अत्यंत संयमाने हा चेंडू पुन्हा त्यांच्याकडेच शिताफीने सरकवत होते. प्रश्न-उत्तराचा हा खेळ चांगलाच रंगला.
डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय चिंतन काय असेल? असा प्रश्न दोन्ही संमेलनाध्यक्षांना विचारण्यात आला, त्यावर डॉ. काळे यांनी परीक्षेच्या आधीच पेपर फोडणार नाही, असे मिश्किल उत्तर दिले. पण एक मात्र आहे, की संमेलनात वाङ्मयीन संस्कृतीचे चिंतन असायला हवे. भाषेशिवाय कोणत्याही वाङ्मयाची निर्मिती होत नाही आणि साहित्याचा रसिकांनी आस्वाद घेतला नाही तर ते काचेच्या बंद पेटीतच राहील, हा भाग तपशीलासह मांडण्याचा प्रयत्न असेल.
सावरकर यांनी पूर्वीच्या संंमेलनाध्यक्षांनी काय केले हे मला माहीत नाही. मात्र, रंगभूमीवर काम न केलेलेच काही घडले नाही असे गळे काढतात. प्रत्येक गोष्टीला चढ-उतार असतात, काळाचा महिमा असतो. ज्या गोष्टींवर टीका करतो ती गोष्ट उद्या हवीशी वाटू शकते, याकडे लक्ष वेधून सावरकर यांनी सध्याचे नाटकाचे दर परवडवणारे नाहीत, मध्यमवर्गीयांचे करमणुकीचे एक बजेट ठरलेले असते त्या बाहेर त्यांना जाता येत नाही, त्यामुळे आस्वाद घेण्याची प्रक्रिया किती रसिक करू शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नट, निर्माते आणि ठेकेदारांनी नाट्यगृहांच्या दुरुस्तीेसाठी सरकारवर विसंबून न राहाता ही नाट्यगृहे व्यवस्थित ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: The monuments of the authors are hidden in the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.