स्मारकाचे भूमिपूजन मे महिन्यात
By admin | Published: April 7, 2016 02:53 AM2016-04-07T02:53:52+5:302016-04-07T02:53:52+5:30
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी मे महिन्यातील तारीख निश्चित करीत आहोत
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी मे महिन्यातील तारीख निश्चित करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. स्मारकाचे काम ४० महिन्यांत पूर्ण करायचे आहे, यासाठी लागणारा निधी राज्य सरकार देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू झाले नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, यावर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी २०१४-१५ साली १०० कोटी, तर २०१५-१६ साली ७० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, स्मारकाकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निवड करण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, तीन वेळा निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या. चौथ्या वेळी निविदा प्रक्रियेद्वारे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निवड करण्यात आली. प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.’
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्मारकासाठीचा निर्णय घेतला होता, तेव्हा केंद्र सरकारने सीआरझेडचा मुद्दा उपस्थित केला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत तीन बैठका घेतल्या होत्या, पण केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. नवे सरकार आले, तेव्हा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत बैठक झाली व त्यानंतर सीआरझेडचा मुद्दा निकाली काढण्यात आला. विशेष म्हणजे, दोन वर्षांत नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, तटरक्षक दल आणि महापालिका अशा अनेक प्राधिकरणांच्या परवानग्या घेण्यात आल्या. ‘या कामाचे भूमिपूजन करायचे असेल, तर ओहोटीची वेळ पाहावी लागेल, याकरिता आपण मे महिन्याच्या तारखा पाहात आहोत. स्मारक उभारण्यात येणारे बेट लहान असले, तरी स्मारकाबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. हा विषय अस्मितेचा असून, स्मारकामुळे राज्यासह देशाची मान उंचावणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)