‘चांदनी’ अनंतात विलीन ! सेलिब्रिटींसह चाहत्यांचा साश्रुपूर्ण निरोप : सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:59 AM2018-03-01T03:59:04+5:302018-03-01T03:59:35+5:30
आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाली. तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाली. तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजविलेल्या ट्रकवरून निवासस्थानापासून दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अखेरचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
श्रीदेवीचा मृतदेह मंगळवारी रात्री दुबईतून आणण्यात आला होता. त्यानंतर, सकाळपासून अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे सकाळी ६ वाजल्यापासून चाहत्यांनी इतकी गर्दी केली की, त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अनेक राज्यांतून तिचे चाहते अंत्यदर्शनासाठी आले होते. श्रीदेवीवर धार्मिक विधी करण्यात आले. एखाद्या नववधूप्रमाणे श्रीदेवी यांचे पार्थिव सजविण्यात आले होते. त्यांना लाल रंगाची बनारसी साडी नेसविली होती. भांगात कुंकू भरण्यात आले आहे.
...आणि उपस्थितांना अश्रू आवरेनात-
सलामीनंतर सव्वादोनच्या सुमारास श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी नेण्यात आले. तिथून त्यांच्या आवडत्या पांढºया रंगाच्या फुलांनी सजविलेल्या वाहनातून विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत पार्थिव नेऊन अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी त्यांचे पती बोनी कपूर, जान्हवी, खुशी यांच्यासह उपस्थितांना अश्रू रोखता आले नाहीत.
अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी-
पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर सर्वांनी श्रीदेवीचे पती बोनी कपूर, मुलगी जान्हवी, खुशी, अभिनेता अनिल कपूर, अर्जुन कपूर यांचे सांत्वन केले. अमिताभ बच्चन, जितेंद्र, शाहरुख खान, जया बच्चन, रेखा, ऐश्वर्या रॉय, सैफ अली खान, डेव्हिड धवन, अरबाज खान, प्रेम चोपडा, हिमेश रेशमिया, विवेक ओबेरॉय, श्रेयस तळपदे, संजय लीला भन्साळी, आफताब शिवदासानी, दीपिका पदुकोन, रणवीर सिंग, चंकी पांडे, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल, सुनील शेट्टी, तब्बू, सुश्मिता सेन, हेमा मालिनी, अक्षय खन्ना, फराह खान, सरोज खान, अजय देवगन, काजोल, मुकेश खन्ना, अन्नू कपूर आदींनी अंत्यदर्शन घेतले.