वाघाच्या बछडयांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी मुनगंटीवारांची - उद्धव ठाकरे
By admin | Published: December 29, 2015 10:00 AM2015-12-29T10:00:55+5:302015-12-29T10:00:55+5:30
वाघाच्या चार बछडयांच्या झालेल्या मृत्यूवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र सामना'च्या अग्रलेखातून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात अन्न-पाण्या अभावी तडफडून वाघाच्या चार बछडयांच्या झालेल्या मृत्यूवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी वन परिक्षेत्रातील नवेगाव विटा या गावाजवळ थंडी आणि उपासमारीने व्याकूळ असलेले चार बछडे गावकर्यांना दिसले. त्यातील दोघांनी आधीच प्राण सोडला होता, मात्र इतर दोन बछड्यांचे प्राण वाचणे शक्य असूनही वाचू शकले नाहीत. एका पिलाचा तर जागेवरच मृत्यू झाला आणि उरलेल्या बछड्याचा जीव जाण्यास कारणीभूत ठरली ती वनखात्याची ‘तू तू – मैं मैं’ अशा शब्दात वनखात्याच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवर चंद्रपूर जिल्ह्यातून येतात. त्यांच्याच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे अग्रलेखात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच तालेवार मंत्री विदर्भातील आहेत. तरीही वाघाचे चार बछडे थंडी आणि भुकेने तडफडून मेले. एरवी मेळघाटातील आदिवासी बालकांचे कुपोषणाने मृत्यू होतात. आज चंद्रपुरातील वाघाची पिले भुकेने तडफडून मेली. विदर्भाचा अनुशेष आणि त्यासाठी स्वातंत्र्याच्या ‘डरकाळ्या’ फोडणार्यांचे यावर काय म्हणणे आहे? असा सवाल मुनगंटीवार यांना विचारला आहे.
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे
आपल्या देशात माणसांचेही भूकबळी जातात आणि प्राण्यांचेदेखील. एकीकडे या देशात विक्रमी वेळेत ‘जिवंत हृदया’ची वाहतूक करून माणसाचे जीव वाचविले जात आहेत आणि दुसरीकडे याच देशात भुकेने व्याकूळ वाघाचे बछडे वैद्यकीय उपचार वेळेत न झाल्याने प्राण सोडत आहेत हे त्या बिचार्या बछड्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
सरकारी बेपर्वाई आणि उदासीनता कशी अनेकांच्या जीवावर बेतते हा अनुभव आपल्याकडे नवीन नाही. या बेपर्वाईने माणसाचे बळी जातात तसे पशू-पक्ष्यांचेही जातात. आता त्यात वाघाच्या चार कोवळ्या बछड्यांची भर पडली आहे. पुन्हा राज्याच्या वनमंत्र्यांच्याच भागात म्हणजे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी वन परिक्षेत्रातील नवेगाव विटा या गावाजवळ थंडी आणि उपासमारीने व्याकूळ असलेले चार बछडे गावकर्यांना दिसले. त्यातील दोघांनी आधीच प्राण सोडला होता, मात्र इतर दोन बछड्यांचे प्राण वाचणे शक्य असूनही वाचू शकले नाहीत. एका पिलाचा तर जागेवरच मृत्यू झाला आणि उरलेल्या बछड्याचा जीव जाण्यास कारणीभूत ठरली ती वनखात्याची ‘तू तू – मैं मैं’.
वन विभाग आणि वनविकास महामंडळ या दोन खात्यांमधील ‘सीमावाद’ थांबायला काहीच हरकत नव्हती, पण तसे झाले तर ते सरकारी विभाग कसले! बछड्यांच्या मृत्यूची जबाबदारी परस्परांवर ढकलण्याचा वाद बराच काळ सुरू होता. आपल्यातील व्याघ्र प्रकल्पाचा गाजावाजा तर मोठ्या प्रमाणात केला गेला, पण वाघाचे चार-चार बछडे अशा पद्धतीने भुकेने तडफडून मरणार असतील आणि त्यांना वाचविणे वन विभागालाच शक्य होणार नसेल तर कसे व्हायचे? पुन्हा ज्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वनखात्याचाही भार आहे त्यांच्याच चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकार व्हावा? प्रश्न विदर्भाच्या जंगलातील ‘वाघां’चा आहे. वनमंत्री म्हणून येणार्या नैतिक जबाबदारीचा आहे.
मुख्यमंत्र्यांसह सर्वच तालेवार मंत्री विदर्भातील आहेत. तरीही वाघाचे चार बछडे थंडी आणि भुकेने तडफडून मेले. एरवी मेळघाटातील आदिवासी बालकांचे कुपोषणाने मृत्यू होतात. आज चंद्रपुरातील वाघाची पिले भुकेने तडफडून मेली. विदर्भाचा अनुशेष आणि त्यासाठी स्वातंत्र्याच्या ‘डरकाळ्या’ फोडणार्यांचे यावर काय म्हणणे आहे? विदर्भाचा अनुशेष भरून निघायलाच हवा, पण पाथरीसारख्या घटना घडल्या तर उद्या विदर्भात वाघांचाही ‘अनुशेष’ निर्माण होईल. त्यामुळे राज्य सरकारने वाघिणींसाठीदेखील एखादी ‘सकस आहार योजना’ सुरू करावी म्हणजे वाघ, वाघीण आणि वाघांच्या बछड्यांचे तरी कुपोषण थांबू शकेल.
मृत बछड्यांच्या आईचा, म्हणजे वाघिणीचा शोध घेण्याचे, तसेच त्यासाठी कॅमेरा ट्रॅप’ लावण्याचे आदेशही दिले आहेत. उद्या ही वाघीण सापडेलही पण तिची पिले तिला परत मिळणार आहेत का? बरं, वाघीण कधीही आपल्या नवजात पिलांना सोडून कुठेही जात नाही. मग या दुर्दैवी बछड्यांना सोडून त्यांची आई कुठे गेली? कारण त्यामुळेच या बछड्यांना ‘आईचे दूध’ सलग तीन दिवस मिळाले नाही आणि त्यांची उपासमार झाली. या वाघिणीची शिकार तर झाली नाही ना, असा दाट संशय येण्यास जागा आहे. तेव्हा वाघिणीचा शोध सरकारने घ्यावाच पण जर तिची शिकार झाली असेल तर शिकार्यांनाही हुडकून काढावे. शिकारीबरोबरच निष्पाप बछड्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.