लोणार सरोवरात मोराची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:49 AM2017-07-19T00:49:32+5:302017-07-19T00:49:32+5:30
वन्यजीव अभयारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार करून चंदनाच्या लाकडावर मांस शिजवून त्यावर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार (जि. बुलडाणा) : वन्यजीव अभयारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार करून चंदनाच्या लाकडावर मांस शिजवून त्यावर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
येथील वन्यजीव अभयारण्यात विविध पशू-पक्षी असून मोरांची संख्या जास्त आहे. सकाळी फिरण्यास गेलेल्या नागरिकांना किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चुली केल्याचे आढळले. चुलीत जळालेली चंदनाची लाकडेही दिसून आली.
या घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
वन्यजीव अभयारण्याच्या नियमाप्रमाणे अभयारण्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तींची नावे नोंद केली जातात.
अग्नीजन्य वस्तू नेण्यास बंदी आहे. परंतु येथे नियमांनाच धाब्यावर बसविल्याने वन विभागाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.