मोरबे धरणग्रस्त अजूनही नागरी सुविधांपासून वंचित
By admin | Published: April 26, 2016 03:17 AM2016-04-26T03:17:34+5:302016-04-26T03:17:34+5:30
खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत
आविष्कार देसाई,
अलिबाग- खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. आदिवासी समाजाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बेफिकिरी अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.
तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी येथे धरणाची उभारणी करण्याचे ठरले. सुमारे १९९४ साली धरण बांधण्यात आले. खालापूर तालुक्यातील चौक येथील पारकर बोरगाव, बौध्दवाडी, पिटकर वाडी, उंबरणे वाडी, अरकस वाडी, बोरगाव, नानीवली, नमऱ्याची वाडी, नढाळ वाडी, ओरशे कातकरवाडी, मोरबे कातकरवाडी, नढाळ नवीन, पडीर, कोयेने गाव या गाव वाड्यातील नागरिकांच्या जमिनी या धरणामध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना तीन ते पाच हजार रुपये एकरी या दराने जमिनी विकाव्या लागल्या होत्या.
जमिनी घेताना पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासन आणि सरकारने दिले होते. १५ वर्षे उलटून गेली तरी, वाड्या-वस्त्यांवर वीज पोचलेली नाही, रस्ते शोधूनही सापडणार नाहीत, गावठाण नाही, मैदान नाही, जागेची मोजणी झालेली नाही. स्मशानभूमीचाही मुद्दा आहे. अलिकडेच संघर्ष करून पाणी मिळाले आहे. प्रशासनही ठोस निर्णय घेत नसल्याचे मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.