विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:36 AM2021-02-20T03:36:23+5:302021-02-20T06:23:52+5:30
CoronaVirus News : कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी १२४७ चाचण्यांपैकी नव्याने १०८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३० जण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने कुणी मृत्यू पावले नाही. ७२४ रुग्ण आयसोलेशन आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११११३ झाली आहे.
गत २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात १२६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला तर २५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात तब्बल ५९८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून नवीन वर्षातील हा नवा उच्चांक आहे.
अकोल्यात रेमडिसीव्हरचा फक्त दहा दिवसांचा साठा
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसिव्हर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे. गत आठवडाभरापासून दररोज ३० रेमडिसिव्हर व्हायलचा उपयोग होत आहे. यापूर्वी दिवसाला ३ व्हायलचीच गरज होती. सध्या रुग्णालयात दहा दिवस पुरेल एवढाच साठा आहे.
जिल्हाधिकारी रस्त्यावर
यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बसस्थानक चाैक व इतरही भागाला भेटी दिल्या.
औरंगाबादेत २६ हजार रुपये दंड वसूल
औरंगाबाद : संसर्ग वाढत असल्याने मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सहा कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल केला.