विमानतळविरोधी शेतकऱ्यांचा मंत्री शिवतारेंच्या घरावर मोर्चा
By Admin | Published: December 27, 2016 01:07 AM2016-12-27T01:07:29+5:302016-12-27T01:07:29+5:30
पुरंदरमधील विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांचा विरोध तीव्र होत असून, तेथील ग्रामस्थ सासवड येथे आंदोलन करीत आहेत. सोमवारी त्यांनी पुणे-पंढरपूर हा राष्ट्रीय
सासवड (जि. पुणे): पुरंदरमधील विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांचा विरोध तीव्र होत असून, तेथील ग्रामस्थ सासवड येथे आंदोलन करीत आहेत. सोमवारी त्यांनी पुणे-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग दीड तास रोखून धरत तीव्र आंदोलन केले. विमानाची अंत्ययात्रा काढून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या घरावर मोर्चा नेला. शासन विमानतळाचा हा प्रकल्प रद्द रद्द करीत नाही, तोपर्यंत आंदोलने करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने या वेळी दिला.
बाधितांच्या भावनांची कोणतीही दखल न घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे नवीन विमानतळ पुरंदरला होणार असल्याची घोषणा केली, तसेच जिल्हाधिकारीदेखील याबाबत शासकीय अधिकारी आणि बाधित गावांतील सरपंच व प्रमुखांची समिती केल्याची खोटी घोषणा करतात. तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याला पाठिंबा देतात, असे सांगत शासन, लोकप्रतिनिधी आणि काही फुटीर लोकांचा या वेळी निषेध करण्यात आला.
विमानतळामुळे बाधित होत असलेल्या मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडीसह १० गावांतील हजारो बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाला पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी पाठिंबा दिला. याचबरोबर, मेधा पाटकर यांच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. तहसीलदार सचिन गिरी यांनी आंदोलनाच्या स्थळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. (प्रतिनिधी)