बेस्ट कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसोबत काढला मोर्चा
By admin | Published: July 19, 2016 05:25 AM2016-07-19T05:25:22+5:302016-07-19T05:25:22+5:30
बेस्टचे खासगीकरण होत असल्याचा आरोप करत बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी कुटुंबीयांसोबत आझाद मैदानात निदर्शने केली
मुंबई : बेस्टचे खासगीकरण होत असल्याचा आरोप करत बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी कुटुंबीयांसोबत आझाद मैदानात निदर्शने केली. या मोर्चात बेस्ट वर्कर्स युनियनसोबत बेस्ट कामगार संघटना आणि समर्थ बेस्ट कामगार संघटनेतील कामगारांनी सहभाग घेतला.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचा खासगी बसगाड्यांना प्रवासी वाहतूक करू देण्याचा निर्णय चुकीचा आहे. या धोरणामुळे प्रवासी संख्येचे मोठ्या प्रमाणात विभाजन होऊन, बेस्ट सेवा मोडकळीस येईल. शिवाय, त्याचा दूरगामी फटका प्रवाशांनाही सहन करावा लागेल, असा दावा संघटनेने केला आहे.
खासगी कंत्राटदारांकडून कर्मचारी व बसगाड्या भाड्याने घेणे आणि बस धुलाई व स्वच्छतेचे काम करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. अशा निर्णयांमुळे बेस्ट प्रशासन खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)