विविध मागण्यांसाठी श्रमजीवीचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:09 PM2021-08-23T18:09:13+5:302021-08-23T18:09:52+5:30
श्रमजीवी कष्टकरी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले .
नितिन पंडीत
भिवंडी: श्रमजीवी कष्टकरी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले . प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी एस टी स्टँड येथून सुरू झालेल्या या मोर्चात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी हिरामण गुळवी, सागर देसक,मोतीराम नामखुडा, महेंद्र निरगुडा ,आशा भोईर यांसह शेकडोच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते . आदिवासी बांधव ढोर नाय माणूस हाय माणूस हाय, जमीन आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
आदिम व आदिवासी व इतरांना घरकुलांचा लाभ मिळावा ,आदिवासींच्या घराखालील जागा त्यांच्या नावे करावी , रोजगार हमी कायद्या प्रमाणे मागेल त्याला काम मिळावे ,आदिवासी युवकां साठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करून त्यांना कौशल्यावर आधारीत रोजगार द्यावा ,आदिम कातकरी समाजाला तात्काळ शिधावाटप पत्रिका द्याव्यात ,शिधावाटप धारकांना पुरेसे धान्य उपलब्ध करून द्यावी ,गावठाण विस्तार करावा,प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा वैद्यकीय सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून घ्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना देण्यात आले. या मोर्चा मुळे शहरातील कल्याण नाका ते वंजारपट्टी नाका दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.