तपासणीच्या नावाखाली १०० पेक्षा अधिक चिनी कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:45 AM2020-06-30T02:45:05+5:302020-06-30T02:45:29+5:30
चौकशी सुरू; आयातीत दिलेली माहिती, प्रत्यक्ष आलेल्या वस्तू एकच आहेत का, याची पाहणी
मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून मुंबईत विविध वस्तू घेऊन आलेले शेकडो कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात विविध तपासणींमध्ये अडकले आहेत. या कंटेनरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल्स, मोबाइल अॅक्सेसरिज, मशिनरी, कच्चा माल यांचा समावेश आहे.
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जेएनपीटी बंदरात येणाऱ्या कंटेनरमध्ये चीनमधून आलेल्या आयातीचा माल तपासणीसाठी अडवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सध्या चीनमधून आलेले शंभरपेक्षा अधिक कंटेनर विविध तपासणीच्या नावावर बंदरात अडकविण्यात आले आहेत. या कंटेनरच्या आयातीमध्ये दिलेली माहिती व प्रत्यक्षात आलेल्या वस्तू या एकच आहेत का, हे सध्या तपासले जात आहे.
भारतात चीनमधून येणाºया आयातीचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत मोठे आहे. चीनमधून मोठ्या संख्येने मोबाइल व इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात केली जाते. मात्र, तपासणीच्या नावावर आयात करण्यात आलेले कंटेनर अडविण्यात आल्याने, त्यामधून आलेल्या वस्तू देशातील व्यापाऱ्यांना ताब्यात मिळण्यास नेहमीपेक्षा जास्त विलंब होत असल्याने व्यापाºयांमध्ये नाराजी आहे.
एकीकडे चीनच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन सोशल मीडियाद्वारे व इतरांकडून केले जात असताना, प्रत्यक्षात बाजारात मात्र चीनच्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू असल्याने, चीनकडून आयात करण्यात येणाºया वस्तूंची आयात अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे.
माहिती देण्यास असमर्थता
याबाबत, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कंटेनरबाबत काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला, तर कस्टमच्या अधिकाºयांशी संपर्क साधल्यावर त्यांनीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.