रमेश कदमविरोधात आणखी १२७ कोटींचे पुरावे
By admin | Published: March 4, 2016 03:34 AM2016-03-04T03:34:10+5:302016-03-04T03:34:10+5:30
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांच्या विरोधात आणखी १२७ कोटी रुपयांचे घोटाळा केल्याचे पुरावे गुन्हे अन्वेषन विभागाला
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांच्या विरोधात आणखी १२७ कोटी रुपयांचे घोटाळा केल्याचे पुरावे गुन्हे अन्वेषन विभागाला (सीआयडी) सापडले असून, पुरवणी आरोपपत्र लवकरच न्यायालयात सादर करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामंडळात आतापर्यंत ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. त्यासंदर्भात न्यायालयात कदमविरोधात अगोदरच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या वेळी आणखी घोटाळ्याची कागदपत्रे सापडण्याची शक्यता असल्याने पुरवणी आरोपपत्र
दाखल करण्याची परवानगी सीआयडीने न्यायालयाकडे मागितली होती.
ही विनंती न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार सीआयडीने केलेल्या तपासात आणखी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची कागदपत्रे सापडली आहेत, अशी माहिती मंत्री कांबळे यांनी दिली.
या आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग आहेच. या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. त्यांच्या सहभागाची कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर पुराव्यानिशी पवार यांच्याविरोधात बोलेल आणि ही कारवाई लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले.
> ‘त्या’ आलिशान गाड्यांचा होणार लिलाव
रमेश कदम यांनी महामंडळातून कर्ज काढून देत त्यातून आलिशान महागड्या आॅडी, बीएमडब्ल्यू या गाड्या घेतल्या आणि त्या परस्पर राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या, असे सांगत दिलीप कांबळे म्हणाले, सीआयडीने केलेल्या तपासात आतापर्यंत अशा ६० गाड्या आढळून आल्या आहेत. त्या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत.
महामंडळाने गाडी घेण्यासाठी ज्यांना कर्ज दिले त्यांनी तो निधी परस्पर या आलिशान गाड्यांच्या डिलरला दिला आणि त्या गाड्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. गाड्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांचा लिलाव करून ती रक्कम महामंडळाला मिळावी, अशी विनंती सीआयडीने केली होती. ती मान्य करण्यात आली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.