१० महिन्यांत १३०० हून अधिक लोकसेवकांना अटक
By admin | Published: December 10, 2015 02:57 AM2015-12-10T02:57:54+5:302015-12-10T02:57:54+5:30
२०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर : २०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. यातील ५६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे.
विधान परिषदेत रामराव वडकुते, दीपकराव साळुंखे-पाटील, ख्वाजा बेग यांच्यासह इतर आमदारांनी राज्यातील विविध विभागांतील लाचप्रकरणांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत लाचप्रकरणांत विविध खात्यांतील १,३६२ शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. १०५० पैकी ४५० प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १६६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झालेली नाही. तर ३७५ प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा तपास चालू आहे, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली.
साडेतीन वर्षांत १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, २०१२ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात मुंबई परिक्षेत्राअंतर्गत ४७, पुण्यातील ३९ तर औरंगाबाद क्षेत्रातील २५ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरातून देण्यात आली.