पुण्यात धावणार आणखी दीडशे इलेक्ट्रिक बस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 12:07 PM2019-08-09T12:07:38+5:302019-08-09T12:08:05+5:30
देशातील २६ राज्यांमधून ८६ प्रस्तावाअंतर्गत १४ हजार ९८८ ई-बसची मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले
पुणे : प्रदूषणविरहित वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने देशभरातील ६४ शहरांना ५ हजार ५९५ इलेक्ट्रिक बससाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वाधिक पावणे आठशे बस महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या असून, त्यापैकी दीडशे बस पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) मंजूर झाल्या आहेत.
केंद्र सरकारकडून ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ई-बससाठी सार्वजनिक वाहतूक संस्था तसेच शहरे व राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. देशातील २६ राज्यांमधून ८६ प्रस्तावाअंतर्गत १४ हजार ९८८ ई-बसची मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यामधील राज्य परिवहन महामंडळ व शहर वाहतुकीसाठी ५ हजार ९५, दोन शहरांसाठी ४०० बस आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी १०० बस मंजूर करण्यात आल्या आहेत.
फेम योजनेअंतर्गत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ७७५ ई-बस मंजूर झाल्या. नवी मुंबईसाठी सर्वाधिक ३०० बस आहेत. त्याखालोखाल पुण्यासाठी १५०, नवी मुंबई व नागपूरसाठी प्रत्येकी १००, नाशिकसाठी ५० आणि सोलापूरसाठी २५ बसचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५० बस मंजूर करण्यात आल्या आहेत. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टअंतर्गत या बस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रतिबस ५५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या बससाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असून, त्यानंतरच केंद्र सरकारकडून अनुदान वितरीत
केले जाईल.
...........
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या २५ इलेक्ट्रिक बस असून, आणखी १२५ बस लवकरच दाखल होणार आहेत. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. संचालक मंडळाने एकूण ५०० बसला मंजुरी दिली आहे. याची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये आता आणखी १५० बसची भर पडणार आहे. केंद्र सरकार अनुदान देणार असल्याने पीएमपी तसेच दोन्ही महापालिकांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब ठरेल.
......
फेम योजनेअंतर्गत ‘पीएमपी’ने एकूण सहाशे बसचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी दीडशे बसला मंजुरी मिळाली आहे. या सर्व बीआरटी मार्गामध्ये धावण्यायोग्य बारा मीटर लांबीच्या असतील. यापूर्वीच संचालक मंडळाने पाचशे बसला मंजुरी दिली आहे. केंद्राकडून आणखी दीडशे बससाठी अनुदान मिळणार आहे. - नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी