महाराष्ट्रात २५ लाखांहून अधिक बालके गुंतली मजुरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:52 AM2018-05-01T06:52:26+5:302018-05-01T06:52:26+5:30
एकीकडे जागतिक कामगार दिनानिमित्त श्रमशक्तीचा गौरव केला जात असतानाच बालकामगारांची समस्या अद्यापही गंभीर असल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई : एकीकडे जागतिक कामगार दिनानिमित्त श्रमशक्तीचा गौरव केला जात असतानाच बालकामगारांची समस्या अद्यापही गंभीर असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजघडीला २५ लाखांहून अधिक बालकामगार आहेत. शेती, मत्स्यव्यवसायासारख्या पारंपरिक उद्योगांसोबतच दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या दुरुस्तीसारख्या आॅटोमोबाइल क्षेत्रात स्वस्त मजूर म्हणून बालकामगारांचा सर्रास वापर केला जात आहे.
देशाच्या २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा अभ्यास केला असता शेती, जंगलाशी निगडित विविध कामे, मत्स्य व्यवसाय आणि आॅटोमोबाइल क्षेत्रात सर्रास बालमजुरीचा वापर होतो. महाराष्ट्रात आजमितीला १८ वर्षांखालील सुमारे २५ लाख बालकांना मजुरी करावी लागत आहे. यात पारंपरिक उद्योगांसोबतच रिटेल, आॅटोमोबाइल क्षेत्रातील विविध प्रकारच्या दुरुस्ती आदी नव्याने उदयास येत असलेल्या व्यावसायिक क्षेत्रांचाही समावेश असल्याचे ‘चाइल्ड राइट्स अॅण्ड यू’ (क्राय)ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
गरिबी, हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक मुलांना शाळा सोडावी लागते. शालेय शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडलेली ही मुले रस्त्यालगतच्या दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या दुरुस्ती कामात गुंततात. या दुरुस्ती कामासाठी स्वस्त मजूर म्हणून मोठ्या प्रमाणावर बालकामगारांचा वापर केला जातो. आॅटोमोबाइल क्षेत्रातील बालमजुरीतही उत्तर प्रदेशचा क्रमांक देशात पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
२०११ च्या जनगणनेनुसार ५ ते ११ वयोगटातील मजुरांची संख्या एक कोटीच्या आसपास आहे. २००१ च्या तुलनेत यात तब्बल २० टक्क्यांची घट आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बालमजुरीचे प्रकार अधिक आढळून येतात. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना मजुरीला जुंपण्याचे प्रकार अधिक असल्याचे क्रायने आपल्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्टÑ पाचव्या क्रमांकावर : बालमजुरीत उत्तर प्रदेशचा क्रमांक वरचा आहे. त्यापाठोपाठ विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात १८.१ टक्के बालकांना शेतीकामात जुंपण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात हीच टक्केवारी ६.८ आहे. यात मत्स्यव्यवसायात गुंतलेल्या बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रातील बालमजुरीबाबत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या लहानग्यांची संख्या ७.४ टक्के आहे, तर मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ५.१ टक्का बालमजुरी आढळून आल्याचे क्रायने स्पष्ट केले आहे.