मराठवाड्यात आणखी ४ शेतक-यांच्या आत्महत्या
By Admin | Published: December 5, 2014 03:42 AM2014-12-05T03:42:19+5:302014-12-05T03:42:19+5:30
९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला
औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर बीडमध्ये वडिलांचे हाल न पहावल्याने एका शेतकऱ्याच्या मुलाने मृत्यूला कवटाळले. गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्णातील लोहारा शहरातील मनोहर यल्लोरे (५६) यांनी शेतात सतत नापिकी, सोसायटी व बचतगटाचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. ९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कर्जाचा बोजा आणि पायाचे आॅपरेशन करण्यासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दुपारी मेंढा (ता़उस्मानाबाद) येथील शंकर रामा लांडगे (६०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली़ ते मणक्याच्या आजाराने त्रस्त होते़ सततच्या नापिकीमुळे माळरानावर असलेल्या चार एकरातून हातात काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते़ सतत होणारी नापिकी आणि दवाखान्याला होणारा खर्च याला कंटाळून लांडगे यांनी गळफास घेतला.
बीड तालुक्यातील देवी बाभळगाव येथील श्रीराम सोपान जोगदंड (३८) या शेतकऱ्याच्या मुलाने कापसाचे पीक वाया गेल्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी घडली.
औरंगाबाद जिल्ह्णातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथील सांडू बनकर (४४) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. याच विंवचनेतून बुधवारी रात्री घरात जाऊन गळफास घेतला. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बनकर यांच्यावर महाराष्ट्र
ग्रामीण बँकेचे १ लाख ३१ हजार
५४६ रुपये कर्ज, तर विविध
कार्यकारी सोसायटीचे ७,६००
रुपये असे १ लाख ४० हजारांचे कर्ज आहे. (प्रतिनिधी)