ST bus : राज्यातील ९५ टक्क्यांहून अधिक एसटी सुरळीत, २५० आगारांपैकी ११ आगार बंद, गुरुवारीही उपोषण सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:38 AM2021-10-28T06:38:31+5:302021-10-28T06:38:58+5:30
ST bus : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संलग्न असलेल्या अनुक्रमे एसटी कामगार सेना, एसटी वर्कर्स काँग्रेस आणि मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने आझाद मैदान येथे बुधवारी उपोषण केले.
मुंबई : विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी उपोषणाला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. राज्यातील जवळपास ९५ टक्के दैनंदिन फेऱ्या सुरळीत असल्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. संयुक्त कृती समितीमधील संघटनांमध्ये एकमत नसल्याने राज्यातील ९३ हजार एसटी कामगारांच्या आशेवर पाणी फेरले गेले. दरम्यान, बुधवारी उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली असून, उद्याही उपोषण सुरू राहणार आहे, असे संयुक्त कृती समितीकडून सांगण्यात आले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संलग्न असलेल्या अनुक्रमे एसटी कामगार सेना, एसटी वर्कर्स काँग्रेस आणि मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने आझाद मैदान येथे बुधवारी उपोषण केले. उपोषणाच्या ठिकाणी जेमतेम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असल्याने कामगारांनी या उपोषणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. राज्यातील २५० आगारांपैकी ११ आगार पूर्णतः आणि ४ आगार अंशतः बंद होते. राज्यात एसटीच्या ९५ टक्के फेऱ्या सुरळीत सुरू होत्या.
संघटनांच्या कृती समितीच्या उपोषणाचा दैनंदिन प्रवासी फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला नाही, अशी माहिती महामंडळाने दिली. कामगार संघटनांचे प्राबल्य अधिक असलेल्या नाशिक, धुळे जिल्ह्यातील काही आगारांत कामगारांनी उपोषणात भाग घेत प्रवासी वाहतूक बंद केली. मात्र, संध्याकाळनंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई
दिवाळीनिमित्त एसटी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच कामगार संघटनांनी पुकारलेल्या उपोषणामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच गैरहजर कामगारांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सबळ कारणाशिवाय गैरहजर राहणाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई करण्यात येईल, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.