राणे येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले नाहीत, कोकणात त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत- हुसेन दलवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 04:07 PM2017-09-13T16:07:28+5:302017-09-13T16:07:28+5:30
काँग्रेस नेते नारायण राणे व खासदार हुसेन दलवाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सिंधुदुर्गात राणेंना डावलून दलवाईंनी घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हुसेन दलवाई कोण?, त्यांचा सिंधुदुर्गाशी काय संबंध? या राणेंच्या टीकेला हुसेन दलवाईंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मी सिंधुदुर्गचा जावई आहे, पालकमंत्री राहिलेलो आहे. राणे काँग्रेसमध्ये येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले, त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत कोकणात आहेत, असंही हुसेन दलवाई म्हणाले आहेत.
कणकणली, दि. 13 - काँग्रेस नेते नारायण राणे व खासदार हुसेन दलवाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सिंधुदुर्गात राणेंना डावलून दलवाईंनी घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हुसेन दलवाई कोण?, त्यांचा सिंधुदुर्गाशी काय संबंध? या राणेंच्या टीकेला हुसेन दलवाईंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मी सिंधुदुर्गचा जावई आहे, पालकमंत्री राहिलेलो आहे. राणे काँग्रेसमध्ये येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले, त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत कोकणात आहेत, असंही हुसेन दलवाई म्हणाले आहेत. काँग्रेसवर एकाच जिल्ह्यात एकाच पक्षाच्या दोन स्वतंत्र बैठका घेण्याची वेळ आल्यानं त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे.
दरम्यान, यावेळी राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर देखील दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राणे भाजपामध्ये जाणार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. पण भाजपामध्ये त्यांना सन्मान मिळेल, असं वाटत नाही. ईडीची भीती दाखवली जाते, तुमचा भुजबळ करू अशी धमकी दिली जाते. अर्थात राणेसाहेब असल्या धमक्यांना घाबरणार नाहीत,’ असा टोलाही दलवाई यांनी राणेंना हाणला.
तत्पूर्वी नितेश राणेंनीही हुसेन दलवाईंना लक्ष्य केलं होतं. देशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गात येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव नाही. आमचे आजही नारायण राणे हेच देव आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आमच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी प्रदेशस्तरावरून आलेल्या काँग्रेस नेत्यांना भरला. तसेच प्रदेश काँग्रेसची बैठक स्थानिक जिल्ह्यातील नेत्यांनीच ‘हायजॅक’ केल्याचे चित्र निर्माण झाले होते.
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रदेश काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. आम्हाला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फूट पाडण्यासाठी पाठविले नसून, येथील काँग्रेस एकसंध बघून आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे या बैठकीचा वेगळा अर्थ कोणी काढू नये, असा खुलासाही दलवाई यांनी यावेळी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात एक बैठक काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ओसरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी, तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमध्ये एक नेत्यांचे शिष्टमंडळ पाठविले होते. त्यांनीही सावंतवाडीतील आरपीडी महाविद्यालयात दुपारी ३.३० वाजता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांना नव्हते.