मोदींमुळे गुजरातवर दीड लाख कोटींहून अधिक कर्ज - शक्तीसिंह गोहिल
By admin | Published: May 26, 2016 03:57 PM2016-05-26T15:57:26+5:302016-05-26T15:57:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु २ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अच्छे दिन आलेच नाहीत.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु २ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अच्छे दिन आलेच नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानादेखील त्यांचा कार्यकाळ अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यकाळात गुजरातवर दीड लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज झाले, असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व गुजरात विधानसभेतील आमदार शक्तीसिंह गोहिल यांनी केला. नागपूरातील रविभवन येथे पत्रकारपरिषदे दरम्यान ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून हाती सूत्रे घेतली तेव्हा गुजरातवर काहीच कर्ज नव्हते. परंतु ज्यावेळी त्यांनी सत्ता सोडली तेव्हा तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचे राज्यावर कर्ज होते. मोदी यांच्या कार्यकाळातच गुजरात पेट्रोलिअम कॉर्पोरेशनमध्ये २० हजार कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालातून स्पष्ट होत आहे, असा दावा गोहिल यांनी केला.
गेल्या २ वर्षांत देशातील जनतेची केंद्र शासनाने दिशाभूलच केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, तरुण, पेन्शनर इत्यादींमध्ये निराशेचे वातावरण आहे. ‘मेक इन इंडिया’देखील पूर्णपणे अपयशी ठरले असून या कालावधीत निर्यातीमध्ये ३४ टक्क्यांची घट झाली आहे. संपुआच्या शासनकाळात मनरेगाचे काम प्रभावी पद्धतीने सुरू होते.
परंतु मोदी सरकार आल्यापासून २० लाख लोकांना कामच मिळालेले नाही. मोदी जगभरात फिरत असतात. हा स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्याचा प्रकार आहे. परंतु यामुळे देशाचे काय भले झाले, असा प्रश्न गोहिल यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. कॉग्रेसचे कार्यकर्ते सामान्य जनतेमध्ये जाऊन सत्य मांडणार आहेत. २८ मे रोजी पक्षातर्फे मोदी सरकारच्या कामगिरीतील फोलपणा दाखविणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
‘अगस्ता वेस्टलॅन्ड’च्या माध्यमातून कॉंग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असा आरोपदेखील गोहिल यांनी केला. पत्रपरिषदेला प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव डॉ.बबन तायवाडे, सचिव अतुल कोटेचा, सुभाष भोयर, संदीप सिंगलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.