मोरे यांचे नगरसेवकपद रद्द
By admin | Published: May 16, 2016 03:31 AM2016-05-16T03:31:13+5:302016-05-16T03:31:13+5:30
बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवून नगरविकास विभागाने शिवसेनेचे बी.बी. मोरे यांचे नगरसेवकपद रद्द केले
उल्हासनगर : स्वीकृत नगरसेवकपद मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवून नगरविकास विभागाने शिवसेनेचे बी.बी. मोरे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. मोरे यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार किसन जाधव यांनी पालिका व नगररचनाकार विभागाकडे करत त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती.
उल्हासनगरमधील रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते बी.बी. मोरे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याची मागणी शिवसेनेकडे पक्षप्रमुख रामदास आठवले यांनी केली होती. शिवसेना-भाजपा व रिपब्लिकन महायुतीचा विचार करता सेनेने पक्षातर्फे मोरे यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदासाठी महासभेकडे दिले. २०१२ मध्ये सेनेतर्फे मोरे, साई पक्षाचे जीवन इदनानी, राष्ट्रवादीचे मनोज लासी, काँग्रेसचे अनू मनवानी, भाजपाचे प्रदीप रामचंदानी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली.
परंतु मनवानी, मोरे यांच्यासह इतरांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप झाला होता. मनवानी यांनी सादर केलेल्या संस्थेचे सदस्यपद प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांना बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी माजी आमदार शीतलदास हरचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.