४१ ग्रंथालयांचे एक कोटीहून अधिक नुकसान; केवळ ५0 हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 02:19 AM2019-12-01T02:19:32+5:302019-12-01T02:19:57+5:30
१0४ गावांना कवेत घेत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले.
- अविनाश कोळी
सांगली : वाचन चळवळीत मोठे योगदान देणाऱ्या वाचनालयांना यंदाच्या महापुराने जबरदस्त तडाखा दिला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या नुकसानीबाबतचा अहवाल ग्रंथालय संचालकांना पाठविण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील एकूण ४१ ग्रंथालयांचे एक कोटी १६ लाख ४९ हजार १६५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यात सर्वाधिक ६८ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे नुकसान सांगली जिल्ह्यातील वाचनालयांचे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ग्रंथालयांना शासनाकडून भरीव स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा असताना, केवळ प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या पदरात पडली आहे.
यंदाच्या महापुरात सांगली जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांची मोठी हानी झाली. १0४ गावांना कवेत घेत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले. सांगली शहरातही यावर्षी महापुराने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. ५७ फुटांपर्यंत पाणीपातळी गेल्याने सांगलीच्या ६0 टक्के भागाला दणका बसला. अनेक ग्रंथालये पाण्यात गेली. सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून परिचित असलेल्या सांगली नगरवाचनालयातही पाणी घुसल्याने येथील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. पलूस, कडेगाव, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील अनेक ग्रंथालयांमध्ये पाणी शिरले.
सांगलीमधील १७ ग्रंथालयांचे ६८ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगली नगरवाचनालयास ५० हजार रुपयांची मदत मिळाली आहे, असे मुकुंद पटवर्धन यांनी सांगितले.
ग्रंथालय संचालकांकडे प्रस्ताव
राजा राममोहन राय ग्रंथालय योजनेंतर्गत राज्यातील विविध ग्रंथालयांना दरवर्षी निधी दिला जातो. विशेष बाब म्हणून पूरग्रस्त ग्रंथालयांना निधी आणि पुस्तक संच, संगणक आणि फर्निचर (कपाटे) देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव ग्रंथालय संचालकांना पाठवण्यात आला आहे.