डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात
By Admin | Published: July 8, 2016 02:32 AM2016-07-08T02:32:41+5:302016-07-08T02:32:41+5:30
शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. रुग्णांचे नातेवाईक
मुंबई : शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करत असल्याने त्यांच्यापासून सुरक्षा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रुग्णालयांत सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते.
शासकीय आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ५६ पोलीस तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे हंगामी महाअधिवक्ता रोहित देव यांनी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला सांगितले.
‘५६ पोलीस रुग्णालयात कायम कर्तव्यावर असणार नाहीत. ते केवळ गस्त घालतील. ५६पैकी २८ पोलीस शस्त्रधारी असतील. तर उर्वरित होमगार्ड असतील. महिनाभरानंतर याबाबत आढावा घेऊ आणि आवश्यकता भासल्यास अधिक पोलीस रुग्णालयांत तैनात करू,’ असे अॅड. देव यांनी खंडपीठाला सांगितले.
त्यावर उच्च न्यायालयाने ही संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश सरकारला दिले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, असे निरीक्षण खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी नोंदवले होते. जे. जे., सायन, सेंट जॉर्ज, जी. टी. आणि नायर रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. (प्रतिनिधी)