महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:39 AM2021-08-14T06:39:17+5:302021-08-14T06:39:35+5:30

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश

More pollution in 18 cities in Maharashtra | महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

googlenewsNext

- विकास झाडे

नवी दिल्ली : हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र, या मापदंडाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.
केंद्र सरकारने देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. या शहरांनी प्रदूषणाच्या सीमा ओलांडल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे. त्यामुळे हवेची शुद्धता राखण्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत.

या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे तर भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमधील प्रदूषणाचा स्तर १६६, जालंधरमधील प्रदूषणाचा स्तर १६५ आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. 

देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून इंधने आणि वाहनांना बीएस ४ आणि बीएस ६ अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी हवा दूषित करणाऱ्या उपकरणांऐवजी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे. आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. 

देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली 
देशात प्रदूषणात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसतो. नाेव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० पर्यंत असते.
हरयाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.

मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूरही प्रदूषित 
महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. राज्यातील १८ शहरे प्रदूषित आहेत. 
त्यात चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

Web Title: More pollution in 18 cities in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.