रुग्णालयात आणखी सुरक्षारक्षक तैनात
By admin | Published: April 6, 2017 05:37 AM2017-04-06T05:37:16+5:302017-04-06T05:37:16+5:30
डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपानंतर राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य शासन करत असल्याचे चित्र आहे.
मुंबई : डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपानंतर राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य शासन करत असल्याचे चित्र आहे. १ एप्रिल रोजी मुंबईसह राज्यभरात तैनात करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सुरक्षारक्षकानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षेची कृतीशील अंमलबजावणी केल्याचे दिसून आले आहे.
उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत बोलल्यानंतर डॉक्टरांनी पाचव्या दिवशी संप मागे घेतला. त्यावेळेस, मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात १ हजार १०० सुरक्षारक्षक नेमण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. त्या आश्वासनांची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरक्षेची पूर्तता करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात जे. जे रुग्णालयात ८८ सुरक्षारक्षक तर सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रुग्णालयात प्रत्येकी ५८ सुरक्षारक्षक दाखल झाले. याशिवाय, मुंबई पालिकेच्या अखत्यारितील केईएम रुग्णालयात १०५ , नायर रुग्णालयात ६८ आणि कूपर रुग्णालयात २३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)