आजपासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा ‘एसटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:57 AM2018-06-04T01:57:34+5:302018-06-04T01:57:34+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. या जादा बस सोमवारपासून चालविण्यात येणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानिमित्त रायगडावर दरवर्षी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा ३४५वा राज्याभिषेक सोहळा ५ व ६ जून रोजी पार पडणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजी राजे यांनी जादा बस सोडण्यासाठी महामंडळाकडे विनंतीपत्र पाठवले होते.
यानुसार एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वाहतूक विभागाला जादा बस सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत. ४,५ आणि ६ जून रोजी या जादा एसटी सोडण्यात येणार असून, आगाऊ आरक्षणासाठी जवळच्या आगारांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.