साडेतीन लाख कुटुंबे उजळणार, देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:28 AM2017-09-28T01:28:35+5:302017-09-28T01:33:08+5:30
महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांमध्ये वीज आलेली नसून पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत या सर्वांना वीज जोडणी देण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे.
- विश्र्वास पाटील।
कोल्हापूर : महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांमध्ये वीज आलेली नसून पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत या सर्वांना वीज जोडणी देण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे.
देशात अजूनही वीज पोहोचली नाही, अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्रात मार्च २०१५ पर्यंत वीज नसलेली तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात आला. वीज नेण्यासाठी अडचणी आहेत अशा दुर्गम ठिकाणी महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यात अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन महावितरणे केले आहे.
वीजपुरवठा नसलेली कुटुंबे
कोल्हापूर - १३१, सातारा- १०४८३, सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५, ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८, नंदूरबार- ३३६५६, जळगाव- २९३२८, पुणे- २७१३, नांदेड- २२५५८, गडचिरोली- २२४७०, बीड- २२०४४.