अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक
By admin | Published: January 19, 2016 04:06 AM2016-01-19T04:06:58+5:302016-01-19T04:06:58+5:30
आम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
नामदेव मोरे, नवी मुंबई
आम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये फक्त उरण तालुक्यातील २७५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उरण, पेण, खालापूरसह अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
के. सी. शर्मा असे विद्यार्थ्यांची फसवणूक केलेल्या बोगस एजंटचे नाव आहे. शर्मा याने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आम आदमी विद्यार्थी विमा योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमितपणे आर्थिक मदत केली जाणार आहे. विमा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २०० रुपये घेण्यात येणार असल्याचे सर्वांना सांगितले. पण अशाप्रकारची योजना नसल्याचे एलआयसीकडून सांगण्यात आले.
उरण तालुक्यातील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे, पांडुरंग पाटील माध्यमिक विद्यालय चाणंजे, प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्था मोठी जुई, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवा, द्रोणागिरी हायस्कूल करंजा, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय शेवा, जवाहरलाल नेहरू विद्यालय शेवा या शाळांमधील २७५४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये घेतले आहेत. फक्त उरण तालुक्यामधील विद्यार्थ्यांकडून ५ लाख ८ हजार रुपये तोतया एजंटने घेवून पलायन केले आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे. याविषयी नवी मुंबईसह रायगड पोलीस अधिक तपास करत आहेत.