मार्च, एप्रिलमध्ये अवकाळीचा तडाखा
By admin | Published: April 21, 2015 01:24 AM2015-04-21T01:24:02+5:302015-04-21T01:24:02+5:30
राज्याला गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठा तडाखा देण्याबरोबर मार्च व एप्रिल महिन्याच्या सरासरी पावसाचा विक्रम मोडीत काढत
पुणे : राज्याला गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठा तडाखा देण्याबरोबर मार्च व एप्रिल महिन्याच्या सरासरी पावसाचा विक्रम मोडीत काढत शेकडो पटींनी अधिक प्रमाणात पाऊस बरसला.
१ मार्च ते १५ एप्रिल या दीड महिन्यात पावसाने केवळ सरासरीच ओलांडली नाही, तर सरासरीपेक्षा शेकडो पट अधिक पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक १३ हजार ४३८ टक्के अधिक पाऊस झाला.
मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असतात. यंदा मात्र मान्सून परतल्यानंतर देशाच्या विविध भागांत व समुद्रामध्ये निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबांच्या पट्ट्यांमुळे राज्यात अधूनमधून अवकाळी पाऊस व गारपीट सुरूच आहेच. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्येही अवकाळीने तडाखा दिला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, १ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान, राज्यात खूपच कमी पाऊस पडतो. काही जिल्ह्यांमध्ये हे तीन महिने पूर्णपणे कोरडेच असतात. पण यंदा अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. या काळात धुळे वगळता सर्वच ३४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. हे प्रमाण ३०० पासून १३ हजार टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)