ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

By admin | Published: April 23, 2016 03:53 AM2016-04-23T03:53:08+5:302016-04-23T03:53:08+5:30

शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे.

Mortality in rural Maharashtra! | ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

Next

संकेत सातोपे,  मुंबई
शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे. जनगणनेच्या एका अहवालानुसार, १९७१ ते २०१३ या काळात मृत्युदर आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील मृत्युदरामधील तफावत इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.
१९७१ साली राज्याचा मृत्युदर दरहजारी १२.३ होता. मात्र त्याच वर्षी हा दर शहरात ९.७ आणि ग्रामीण भागात १३.५ होता. त्यानंतरच्या दशकात हा दर कमी होत १९८० साली दरहजारी ९.७ एकूण, तर १०.९ ग्रामीण आणि ७.१ शहरी असा झाला. नव्वदच्या दशकात राज्याचा मृत्युदर आणखी कमी होऊन दरहजारी ७.४ वर आला. मात्र त्याही वेळी ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर ८.५ होता, तर शहरी भागात ५.४ होता.
२००० साली हा दर किंचित वाढून दरहजारी ७.५ झाला, याच वर्षी ग्रामीण भागातील दर ८.६, तर शहरी भागातील दर ५.८ असा होता. २०१३मध्ये हा दर आणखी कमी करून राज्याचा एकूण मृत्युदर ६.२ पर्यंत, तर शहरी भागातील मृत्युदर दरहजारी ५ इथपर्यंत खाली आणण्यात शासनाला यश आले. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राचा मृत्युदर दरहजारी दोनने अधिक म्हणजे ७.१ इतका राहिला आहे. दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता कमी असल्यामुळेच ही तफावत जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शहरांमध्ये आरोग्य सेवा, मिळकत आणि शिक्षण यांचे प्रमाण ग्रामीण भागांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच शिक्षण-नोकरीसाठी शहरांत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत वृद्धांची संख्या अधिक आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शहरांतील मृत्युदर ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आहे. ही परिस्थिती शंभर वर्षांपूर्वीही अशीच होती. ती पालटायची असेल, तर ग्रामीण भागांत केवळ आरोग्य सुविधा देऊन भागणार नाही. अन्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील.
- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Mortality in rural Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.