Mosque Loud Speakers: माहिम, मुंब्रा, भिवंडी भागात भोंग्याविना अजान; मनसेनं मानले आभार, हनुमान चालीसा लावली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:28 AM2022-05-04T08:28:58+5:302022-05-04T08:29:59+5:30
मुस्लीम बांधवांनी सामाजिक भान राखत भोंग्यावरून अजान म्हटली. मनसेचा अजानला विरोध नाही. बऱ्याच ठिकाणी भोंग्यावरून अजान दिली नाही.
मुंबई – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवावेत, सुप्रीम कोर्टाचे आदेशाचं पालन करावं अन्यथा जिथे भोंगे लावतील तिथे दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू अशा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी दिला होता. मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मुंबईत १५ हजार मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली. मात्र भोंगे हटवा नाहीतर हनुमान चालीसा वाजवू या भूमिकेवर मनसे ठाम होती.
४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी तयारी केली होती. राज्यातील अनेक भागात हनुमान चालीसा लावण्यात आली. परंतु पनवेल, मुंब्रा, वांद्रे, भिवंडी, माहिम याठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत बऱ्याच ठिकाणी भोंग्याविना अजान झाली. मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावणार होते. मात्र भोंग्याविना अजान झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनीही राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन केले. वांद्रे येथील जामा मशीद, मुंब्रा येथील दारुफाला मशिदीतही बांग देण्यात आली नाही.
मुस्लीम बांधवांनी सामाजिक भान राखत भोंग्यावरून अजान म्हटली. मनसेचा अजानला विरोध नाही. बऱ्याच ठिकाणी भोंग्यावरून अजान दिली नाही. माहिम, मुंब्रा, पनवेल, भिवंडीच्या पडघा इथं भोंग्याविना अजान झाली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही. महाविकास आघाडी सरकारनं जो खोटा प्रचार केला त्याला मुस्लीम बांधवांनी खोटे पाडलं आहे. अजान भोंग्यावरून न झाल्यानं अनेक ठिकाणी हनुमान चालीसा वाजवण्यात आली नाही असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली, भोंगे न लावता अजान पठण केले. त्याबद्दल त्यांचे आभार आहे. मनसे आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारने केले. मात्र मुस्लीम बांधवांनी त्याला चपराक दिली आहे असं मनसे नेते संतोष धुरी यांनी सांगितले.
त्या' मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होता कामा नये
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.