ठाण्यात उच्चभ्रू वस्त्यांत फटाक्यांचे प्रदूषण सर्वाधिक
By admin | Published: November 2, 2016 03:06 AM2016-11-02T03:06:38+5:302016-11-02T03:06:38+5:30
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला.
ठाणे : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाबाबत झालेल्या जनजागृतीचा परिणाम दिवाळीत दिसून आला. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ध्वनी प्रदूषणाची पातळी ही १३० डेसीबलपेक्षाही अधिक झाली होती. यंदा ती १२५ डेसीबलपेक्षाही कमी झाल्याचे पाहणीत आढळले आहे. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांपैकी लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. ठाण्याच्या उच्चभू्र वस्त्यांमध्ये मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण मात्र वाढल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.
वाढत्या जनजागृतीमुळे मोठ्या आवाजांच्या फटाक्यांचे प्रमाण कमी होऊन आतषबाजीच्या फटाक्यांची मागणी मात्र वाढल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे.
मागील काही वर्षांपासून ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर हे ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने यश आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि इतर सामाजिक संस्थांनीदेखील दिवाळीत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती सुरु केल्याने मागील दोन ते तीन वर्षापासून मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे १३० डेसीबल पेक्षा अधिक होते. यंदा या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण हे कित्येक पटीने अधिक असतांनाही आवाजाचे प्रमाण मात्र १२५ डेसीबल पेक्षा कमी असल्याची माहिती बेडेकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या दिवशी शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड आदी भागात फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचे आढळले आहे.
पाचपाखाडी, वर्तकनगर, किंबहुना शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र मोठ्या आवाजाचे आणि वायु प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण हे अधिक आढळून आल्याचेही बेडकर यांनी सांगितले. पहिल्या दिवशी फटाके फोडण्याचे प्रमाण फारच कमी होते. तिसऱ्या दिवशी मात्र हे प्रमाण फारच तुरळक दिसून आले आहे. केवळ लक्ष्मीपुजनाच्याच दिवशीच शहरात अधिक फटाके फोडले गेले आहेत.
>शाळकरी मुलांनी दिला उत्तम प्रतिसाद
मागील काही वर्षात सुरु असलेली जनजागृती आणि शाळांनादेखील विद्यार्थ्यांना केलेले प्रबोधन यामुळे यंदा त्याचा फायदा झाला असून शहरातील उच्चभ्रू वस्ती सोडल्यास इतर ठिकाणी मात्र ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आढळून आले आहे. शाळकरी मुलांनीही मोठ्या आवाजाच्या फटांक्याऐवजी आवाज विरहित फटाक्यांची मागणी लावून धरल्याचादेखील हा परिणाम असून शकतो.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवाजाची पातळी ही सकाळच्या सुमारास ७० ते ७५ डेसीबलपर्यंत होती. तर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ती १२५ डेसीबलपर्यंत पोहचली होती. इतर दिवशी पुन्हा हे प्रमाण ७० डेसीबल पर्यंत आले होते. एकूणच आणखी जनजागृती झाली आणि आपण स्वत:च यातून काही बोध घेतला तर मात्र येत्या काळात ध्वनी प्रदूषणाचे हे प्रमाण आणखी कमी होईल, असा विश्वासही बेडेकर यांनी व्यक्त केला.