मोदींच्या इस्रायल भेटीमुळे शेतीला सर्वाधिक फायदा- अकोव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2017 06:24 PM2017-07-04T18:24:16+5:302017-07-04T18:36:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपासून सुरु झालेल्या इस्रायल भेटीमुळे सर्वाधिक फायदा भारतातील शेतीला होईल असा विश्वास इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत डेव्हीड अकोव्ह यांनी व्यक्त केला.

Most of the farmers benefit from Modi's visit to Israel - Akov | मोदींच्या इस्रायल भेटीमुळे शेतीला सर्वाधिक फायदा- अकोव्ह

मोदींच्या इस्रायल भेटीमुळे शेतीला सर्वाधिक फायदा- अकोव्ह

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपासून सुरु झालेल्या इस्रायल दौऱ्यामुळे सर्वाधिक फायदा भारतातील शेतीला होईल असा विश्वास इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत डेव्हीड अकोव्ह यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अकोव्ह यांनी या भेटीमुळे शेती, सिंचन, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये असणारे संबंध अधिक दृढ होतील असे मत अकोव्ह यांनी व्यक्त केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत बोलताना अकोव्ह पुढे म्हणाले, इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध पुर्वीपासूनच आहेत. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतीक आणि भावनिक बंधही आहेत. तसेच इस्रायलचे मुंबई आणि महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. भारतीय वंशाच्या ज्यूंमध्ये महाराष्ट्रातील ज्यूंचा सर्वात जास्त वाटा आहे. भारताबाहेर मराठीत संवाद साधणारा मोठा समूह इस्रायलमध्ये राहतो. मुंबईही भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळेही या संबंधांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीचा पहिला संबंध महाराष्ट्राशी येईल. पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये शेती, जलसिंचन, आरोग्य, पर्यावरण, संरक्षण या क्षेत्रांमध्ये देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे.
 
भारताच्या शेतीमध्ये इस्रायल कशाप्रकारचे योगदान देऊ शकेल यावर बोलताना अकोव्ह म्हणाले, भारताची मोठी लोकसंख्या आणि अपुरे पाणी पाहता येत्या काळामध्ये भारतीय शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा पर्याय वापरावाच लागेल. इस्रायलने ठिबक तंत्राचा विकास केला असून भारतामधील दुष्काळी भागामध्ये तसेच महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या सिंचनाच्या सोयी कमी प्रमाणात असणाऱ्या प्रदेशामध्ये याचा उपयोग होऊ शकेल. सध्या इस्रायल सरकार मार्फत शेतकऱ्यांना तंत्रज्ञान शिकवण्यासाठी व शेतीमधील नवे बदल शिकवण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स देशातील विविध भागांमध्ये सुरु करण्यात आले आहे. राज्यामध्ये पुणे, नागपूर, इंदापूर, औरंगाबाद येथे शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम सुरु झाले आहे. त्याचप्रमाणे माशोव या सहकारी पद्धतीच्य ग्रामजीवन आणि शेतीच्या प्रयोगाची काही तत्त्वेही येथे राबविण्याचा विचार सुरु आहे. 2015 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायलला भेट दिल्यानंतर यवतमाळ येथे माशोववर आधारित प्रकल्प सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी अशी नवी पावले उचलावी लागतील. दुग्धोत्पादनाच्या विकासाबाबत बोलताना अकोव्ह यांनी सध्या हरयाणामध्ये इस्रायलप्रमाणे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन नवे दुग्धविकास केंद्र स्थापन करण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले. 

नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यासाठी रवाना, इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान 
 
विशेष निधीची निर्मिती
इस्रायलने पाण्याचा उपयोग अत्यंत योग्य पद्धतीने केला असून आज इस्रायल पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिलेला नाही असे सांगत भारतालाही पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा पुनर्वापर तसेच नव्या तंत्रांचा वापर करावा लागेल. इस्रायली जलसंवर्धनाचे मॉडेल कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलियामधील कोरड्या प्रदेशासाठी वापरले जाऊ शकते असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे. हेच मॉडेल मराठवाड्यासह भारतातील विविध प्रदेशात वापरले जाऊ शकेल असे अकोव्ह यांनी सांगितले. इस्रायलने सध्या भारतातील शेती, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये संबंध वाढीस लागावेत यासाठी विशेष 5 अब्ज डॉलर्सची निर्मिती केली  आहे. यामुळे या क्षेत्रांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.
 
स्मार्ट सिटीसाठी तेल अविव आणि ठाणे यांच्यात मैत्री 
महाराषट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेल अविवच्या महापौरांची भेट घेतली. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेल अविवमध्ये वापरलेल्या विविध तंत्रांचा वापर ठाणे शहराच्या विकासासाठी केला जाणार आहे. भारतातील पालिकांचे आयुक्त आणि महापौर यांना  शहरी विकासात तंत्रज्ञानाने केलेली मदत दाखवण्यासाठी इस्रायलला नेण्याची योजनाही आगामी काळात अमलात आणली जाईल.

Web Title: Most of the farmers benefit from Modi's visit to Israel - Akov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.