महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:40 AM2018-05-26T01:40:46+5:302018-05-26T01:40:46+5:30
पाच वर्षांची आकडेवारी : ५ हजार लग्न
मुंबई : समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न होत असतात. यात आंतरजातीय विवाहाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीभेदाच्या भिंती पुसट करण्यात महाराष्ट्र देशात पुढे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पाच वर्षांत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले असून ही संख्या देशात सर्वाधिक आहे.
महाराष्ट्रात २०१२ ते २०१७ या कालावधीत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले. महाराष्ट्रापाठोपाठ केरळचा क्रमांक असून याच कालावधीत तेथे ९,७६० आंतरजातीय विवाह झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असल्यास नागरी हक्कांचे संरक्षण म्हणून आर्थिक मदत केली जाते.
आंतरजातीय विवाहानंतर नवदाम्पत्यांनी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून हा निधी त्यांना दिला जातो.
२००६ पासून या योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात असे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या रकमेत वाढ करण्यात आली असून आता १ लाख २५ हजारांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून केले जाते. शिवाय, विविध राज्य सरकारांकडूनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून निधी दिला जातो.