स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची सध्या सर्वाधिक गरज
By admin | Published: August 22, 2016 05:20 AM2016-08-22T05:20:19+5:302016-08-22T05:20:19+5:30
विरोधी विचारासह, तो मांडणाऱ्यांना नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व त्याची आज सर्वाधिक गरज आहे
पुणे : विरोधी विचारासह, तो मांडणाऱ्यांना नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व त्याची आज सर्वाधिक गरज आहे. हे ओळखून कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा कार्यरत व्हावे व क्रांतीची हाक द्यावी, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केले. तर स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची सध्या सर्वाधिक गरज असल्याचे मत चपळगावकर यांनी व्यक्त केले. तर तरुण प्रश्न विचारायचे बंद होत नाहीत, तोपर्यंत निवृत्त होणार नसल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले.
युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, खा. हुसेन दलवाई, महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते.
सप्तर्षी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी सांगून त्यांच्याशी आपले ऋणानुबंध होते. मी त्यांचा आवडता होतो, उद्धव यांची येथील उपस्थिती त्याचमुळे आहे, असे सांगितले. तोच संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी कुमार जात-पात-धर्म मानत नाहीत, आम्हीही जातपात मानत नाही; मात्र धर्म मानतो. कारण धर्म नसेल तर अधर्माची भीती असते, असे सांगितले. भाषणानंतर ते निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत सप्तर्षी यांच्यासह सर्व वक्त्यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वैचारिक ताकद काय असते ते कुमार यांनी दाखवून दिले आहे. देश ज्यामुळे सर्व क्षेत्रात मागे राहिला तेच प्रतिगामी विचार रुजवायचा प्रयत्न पुन्हा सुरू आहे. आज पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे. तांत्रिक सुधारणांमुळे आता कुमार घरबसल्या ही क्रांती करू शकतात. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे.
चपळगावकर म्हणाले, हा सत्कार फक्त कुमारांचा नाही, तर त्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या तत्कालीन सर्व युवकांचा आहे. आजही तसे संघटन करण्याची गरज आहे. जातपात-धर्म व राजकीय फायदा यांचा विचार न करणारे युवक, कुमार हे पुन्हा उभे करू शकतात. स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे. (प्रतिनिधी)
>उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती
सप्तर्षी यांची समाजवादी विचारधारा व शिवसेनेचा हिंदुत्ववाद हे परस्परविरोधी असतानाही कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यपाल होण्यासाठी कुमार एकदम फीट आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तक चाळले. त्यात एक-दोन ठिकाणी शिवसेना असा उल्लेख आहे. सविस्तर वाचनानंतर काय आहे ते समजले, असे ठाकरे म्हणाले.